जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | नाशिक येथील एका नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीत (MNC) हिंदू महिला कर्मचाऱ्यांवर झालेल्या लैंगिक छळ आणि धार्मिक सक्तीच्या प्रकरणाचे तीव्र पडसाद आता संपूर्ण राज्यात उमटू लागले आहेत. या गंभीर प्रकरणाच्या निषेधार्थ आणि दोषींवर कठोर कारवाईच्या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने निवासी जिल्हाधिकारी वैशाली चव्हाण यांना गुरुवारी निवेदन देण्यात आले. हे प्रकरण केवळ महिला छेडछाडीचे नसून, हा अत्यंत खोलवर पसरलेल्या विखारी जिहादी मानसिकतेचा आणि संघटित ‘कॉर्पोरेट जिहाद’चा भाग असल्याचा खळबळजनक आरोप समितीने यावेळी केला आहे.
उत्तर महाराष्ट्र संघटक प्रशांत जुवेकर यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आलेल्या या निवेदनात म्हटले आहे की, संबंधित कंपनीत गेल्या चार वर्षांपासून हिंदू महिलांना जाणीवपूर्वक लक्ष्य केले जात आहे. वरिष्ठ पदावर बसलेल्या मुसलमान समुदायाच्या व्यक्तींनी आपल्या अधिकाराचा गैरवापर करून महिलांचा लैंगिक छळ करणे, त्यांच्यावर बलात्कार करणे आणि त्यांना धर्मांतरासाठी प्रवृत्त करणे असे धक्कादायक प्रकार घडले आहेत. इतकेच नव्हे तर महिलांना गोमांस खाण्यासाठी बाध्य करणे आणि नमाज पठणासारख्या धार्मिक कृतींसाठी सक्ती करणे, असे प्रकारही समोर आले आहेत. पीडित महिलांनी तक्रार करण्याचा प्रयत्न केला असता, त्यांना कामावरून काढून टाकण्याची धमकी देऊन गप्प करण्यात आले, जे अत्यंत संतापजनक आहे.

हिंदु जनजागृती समितीने या प्रकरणाची व्याप्ती पाहता राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या (CID) वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत ‘विशेष तपास पथक’ (SIT) नेमून सखोल आणि वेळबद्ध चौकशी करण्याची मागणी केली आहे. ज्या कंपनीत महिलांची अब्रू लुटली जाते आणि धर्मांतराचे कारस्थान रचले जाते, अशा कंपनीचा व्यवसाय परवाना रद्द करून तिला टाळे ठोकले पाहिजे, अशी आक्रमक भूमिका समितीने मांडली आहे. तसेच, कंपनी व्यवस्थापनाने या तक्रारींकडे दुर्लक्ष केल्यामुळे त्यांच्यावरही कठोर कलमान्वये गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.
या निवेदनाद्वारे प्रशासनाला इशारा देण्यात आला आहे की, जर या नराधमांवर आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या व्यवस्थेवर त्वरित कठोर कारवाई झाली नाही, तर हिंदू समाज शांत बसणार नाही. येणाऱ्या काळात हिंदु जनजागृती समिती अन्य हिंदू संघटनांच्या सहकार्याने संपूर्ण राज्यात तीव्र जनआंदोलन छेडेल. या प्रसंगी सायली पाटील, गायत्री बारी, स्वाती काकडे, अनिता पोळ, ज्ञानेश्वर पाटील, विनोद शिंदे, भूषण पाटील, धनश्री दहिवदकर आणि वैष्णवी दैवज्ञ आदी उपस्थित होते.



