पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाचोरा बसस्थानकावर बसमध्ये चढत असताना प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन एका अज्ञात चोरट्याने महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जयश्री स्वप्नील पाटील (वय २२, रा. विवेकानंद कॉलनी, भडगाव) या १५ एप्रिल रोजी दुपारी १२:३० वाजेच्या सुमारास पाचोरा येथून आपल्या गावी जाण्यासाठी बसस्थानकावर आल्या होत्या. पाचोरा ते जळगाव या बसमध्ये चढत असताना प्रवाशांची मोठी गर्दी होती. याच गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने जयश्री यांच्या गळ्यातील ३० हजार रूपये किंमतीचे सोन्याचे मंगळसूत्र, ज्यात ३ मणी आणि २ वाट्या होत्या, अत्यंत शिताफीने चोरून नेले.

काही वेळाने गळ्यातील मंगळसूत्र चोरीला गेल्याचे जयश्री यांच्या लक्षात आले. त्यांनी तात्काळ पाचोरा पोलीस ठाणे गाठून घडल्या प्रकाराबाबत तक्रार दिली. त्यानुसार पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल श्रीकांत गायकवाड करत आहेत.



