जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या जिल्हाधिकारी बंगला परिसरातून पायी जाणाऱ्या एका ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील २५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र दोन अज्ञात दुचाकीस्वारांनी जबरीने हिसकावून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, निलिमा विश्वासराव पाटील (वय ६६, रा. खांदेशमिल कॉलनी, जळगाव) या १५ एप्रिल रोजी सायंकाळी ७:१५ वाजेच्या सुमारास भाऊंच्या उद्यानाकडून पायी घरी परतत होत्या. त्या जिल्हाधिकारी बंगल्याजवळ आल्या असता, पाठीमागून मोटारसायकलवर आलेल्या दोन अज्ञात तरुणांनी त्यांच्या गळ्यातील सुमारे ६२ हजार रुपये किमतीची २५ ग्रॅम वजनाची सोन्याची मणी-मंगळसूत्र असलेली पोत जोरात हिसकावून नेली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे पाटील यांनी आरडाओरड केली, मात्र तोपर्यंत चोरटे दुचाकीवरून वेगाने फरार झाले.

या घटनेनंतर निलिमा पाटील यांनी तातडीने रामानंद नगर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानुसार अनोळखी दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदिप पाटील हे करत आहेत.



