Home Cities जळगाव विद्यार्थ्यांनी सलग १२ तास अभ्यास करून महामानवाला दिली अनोखी मानवंदना

विद्यार्थ्यांनी सलग १२ तास अभ्यास करून महामानवाला दिली अनोखी मानवंदना


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त जळगाव येथील शासकीय आयुर्वेद महाविद्यालयात ‘संविधान-शक्ती : १२ तास सतत अभ्यास’ हा उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. १३ एप्रिल रोजी सकाळी ७ ते रात्री ७ या वेळेत आयोजित या उपक्रमात ३८ विद्यार्थ्यांनी सलग १२ तास एकाग्रतेने अभ्यास करून महापुरुषांना अनोख्या पद्धतीने अभिवादन केले.

या उपक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांसोबतच महात्मा ज्योतिबा फुले आणि सम्राट अशोक यांच्या समाजप्रबोधनात्मक कार्याचाही जागर करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमेला अभिवादन करून करण्यात आली. त्यानंतर संविधान वाचनाचे सत्र घेण्यात आले, ज्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संविधानाबद्दल जागरूकता आणि आदराची भावना अधिक दृढ झाली.

यानंतर विद्यार्थ्यांनी बीएएमएस अभ्यासक्रमावर लक्ष केंद्रित करत १२ तास शांततेत अभ्यास केला. विशेष बाब म्हणजे, या संपूर्ण कालावधीत विद्यार्थ्यांनी मोबाईलचा वापर पूर्णतः टाळून एकाग्रतेचा आदर्श घालून दिला. त्यांच्या या शिस्तबद्ध आणि समर्पित प्रयत्नांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

या उपक्रमाचे उद्घाटन अधिष्ठाता डॉ. संतोष चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. सुभाषचंद्र मडावी, डॉ. सचिन नरवाडे आणि डॉ. रेणुका देव्हारे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी “उत्सव साजरा करण्यापेक्षा विचारांची अंमलबजावणी अधिक महत्त्वाची आहे,” असा मोलाचा संदेश देण्यात आला, ज्याने विद्यार्थ्यांना प्रेरित केले.

दिवसभर अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचा ‘विश्वरत्न ग्रँड प्राईज’, ‘द पॉलिमॅथ अवॉर्ड’, ‘द कॉन्स्टिट्यूशन गार्ड’ आणि ‘द पर्सिस्टन्स अवॉर्ड’ या विशेष पुरस्कारांनी गौरव करण्यात येणार आहे. या अभिनव उपक्रमाची शैक्षणिक क्षेत्रात विशेष दखल घेतली जात असून, विद्यार्थ्यांच्या जिद्द आणि अनुशासनाचे हे उदाहरण ठरत आहे.


Protected Content

Play sound