Home Cities जळगाव जळगावात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त संत रोहिदास महाराज संस्थेकडून आदरांजली

जळगावात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त संत रोहिदास महाराज संस्थेकडून आदरांजली


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शहरातील राज मालती नगर भागात भारतरत्न, ज्ञानसूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली. संत रोहिदास महाराज चर्मकार बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात समाज बांधवांनी मोठ्या संख्येने एकत्र येत महामानवाच्या स्मृतीस विनम्र अभिवादन केले.

राज मालती नगर येथील संत रोहिदास महाराज समाज मंदिर येथे हा सोहळा पार पडला. कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले, यावेळी उपस्थितांनी दिलेल्या डॉ. बाबासाहेबांच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. कार्यक्रमाचे अध्यक्ष किशोर धोरे यांनी आपल्या भाषणातून बाबासाहेबांच्या जीवनकार्यावर आणि विचारांवर प्रकाश टाकला. महामानवाचे विचार केवळ एका समाजापुरते मर्यादित नसून ते संपूर्ण मानवजातीला प्रगतीचा मार्ग दाखवणारे आहेत, असे मत त्यांनी व्यक्त केले. तसेच समाजाने शिक्षण आणि संघटनेच्या जोरावर आपली प्रगती साधावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष किशोर धोरे, उपाध्यक्ष विजय खजुरे, सचिव दीपक मेथे यांच्यासह संजय अहिरे, राजू धोरे, रवी धोरे, कैलास मेथे, भाईदास कासवे, सुनील वाघ, रवींद्र जाधव, सचिन पवार, छोटू धोरे, विजय अहिरे, दीपक माने, ललित धोरे आणि संतोष धोरे यांच्यासह इतर पदाधिकारी व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेच्या सर्व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.


Protected Content

Play sound