Home Cities जळगाव सामाजिक न्याय विभागातील उत्कृष्ट कर्मचाऱ्यांचा जिल्हाधिकारी यांच्याहस्ते गौरव

सामाजिक न्याय विभागातील उत्कृष्ट कर्मचाऱ्यांचा जिल्हाधिकारी यांच्याहस्ते गौरव


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून ८ ते १४ एप्रिल या कालावधीत आयोजित ‘सामाजिक समता सप्ताहा’चा जळगाव येथे उत्साहात पार पडला. या निमित्ताने जिल्हा नियोजन भवन येथे अभिवादन कार्यक्रम आणि ‘कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान मेळावा’ मोठ्या दिमाखात पार पडला.

मान्यवरांची उपस्थिती:
या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर जिल्हाधिकारी रोहन घुगे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर, महापौर दीपमाला काळे, आदिवासी प्रकल्प अधिकारी (यावल) अरुण पवार, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण योगेश पाटील, जिल्हा कृषी अधीक्षक कुर्बान तडवी, साहित्य अकादमी विजेते लेखक राजू बाविस्कर आणि ज्येष्ठ रंगकर्मी शंभू पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रबोधनात्मक व्याख्याने:
यावेळी जिल्हा कृषी अधीक्षक कुर्बान तडवी यांनी “कृषी क्षेत्रातील तंत्रज्ञानाची नवी लाट” या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती कशी फायदेशीर ठरेल, याचे त्यांनी विश्लेषण केले. तर ज्येष्ठ रंगकर्मी शंभू पाटील यांनी “मानवी हक्कांचे प्रतीक: चवदार तळे सत्याग्रह” या विषयावर विशेष व्याख्यान दिले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला लढा हा केवळ पाण्याचा नसून तो मानवी प्रतिष्ठेचा होता, असे प्रतिपादन त्यांनी केले.

शासकीय लाभ आणि सन्मान:
कार्यक्रमात सामाजिक न्यायाच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल उचलत, अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत पीडित कुटुंबातील वारसांना शासकीय/निमशासकीय नोकरीचे नियुक्ती आदेश देण्यात आले. तसेच, आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांना ५० हजार रुपयांच्या धनादेशाचे वितरण करण्यात आले.

याशिवाय, विविध शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात लाभ वाटप करण्यात आले. सामाजिक न्याय विभागात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते विशेष गौरव करण्यात आला. या कार्यक्रमास जिल्ह्यातील शेतकरी, लाभार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Protected Content

Play sound