अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर शहरात सध्या इतर वाहनांच्या तुलनेत रेती वाहतूक करणाऱ्या डंपरचा सुळसुळाट झाला असून, यामुळे वाहतुकीचे तीन तेरा वाजले आहेत. याच अनियंत्रित वाहतुकीने तहसील कार्यालयासमोरच एका वृद्ध व्यक्तीचा बळी घेतला आहे. डंपरच्या धडकेत गंभीर जखमी झालेले शेख अब्दुल (वय ६५, रा. जोशीपुरा, अमळनेर) यांचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण शहरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
मयत शेख अब्दुल हे बसस्थानकाजवळ चहाचे छोटे दुकान चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. त्यांच्या पश्चात दोन मुले आणि दोन मुली असा परिवार आहे. रविवारी १३ एप्रिल रोजी रात्री गजबजलेल्या तहसील कार्यालय आणि प्रांत कार्यालय परिसरात एका भरधाव रेती डंपरने त्यांना जोरात धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, अब्दुल हे जागीच गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र आज त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली.

विशेष म्हणजे, हा अपघात ज्या ठिकाणी घडला, त्याच्या हाकेच्या अंतरावर प्रांत आणि तहसीलदार कार्यालय आहे. सरकारी यंत्रणांच्या नाकाखालीच क्षमतेपेक्षा जास्त अवजड वाहतूक आणि रेतीचे डंपर धावत असल्याने नागरिकांनी अधिकाऱ्यांवर जोरदार ताशेरे ओढले आहेत. गेल्या महिनाभरात डंपरमुळे झालेल्या अपघातात तीन ते चार निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
यावेळी नागरीकांनी प्रचंड संताप व्यक्त केला. याबाबत अमळनेर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.



