Home आरोग्य डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात समन्वय २०२६ची रंगतदार सुरुवात 

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात समन्वय २०२६ची रंगतदार सुरुवात 


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात आयोजित ‘समन्वय २०२६’ सप्ताहाची उत्साहपूर्ण सुरुवात आर्ट गॅलरीच्या उद्घाटनाने झाली असून विद्यार्थ्यांनी साकारलेल्या विविध कलाविष्कारांनी उपस्थितांची मने जिंकली आहेत.

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या एमीबीएस अभ्यासक्रमाच्या आग्नेय बॅचतर्फे १२ ते १८ एप्रिल या कालावधीत ‘समन्वय २०२६’ या सांस्कृतिक सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाचा शुभारंभ १२ एप्रिल रोजी आर्ट गॅलरीद्वारे करण्यात आला. उद्घाटनप्रसंगी माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, डॉ. सुहास बोरले, डॉ. अनिकेत पाटील, वैद्यकीय अधीष्ठाता डॉ. प्रशांत सोळंके, रजिस्ट्रार प्रमोद भिरूड, डॉ. विजय बाविस्कर आदी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी धन्वंतरी पूजन करण्यात आले तसेच स्व. गोदावरी आजी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.

या कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक, डॉक्टर आणि विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. आर्ट गॅलरीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी ‘इन्फाईनाइट हॉरिझन’ या थीमवर आधारित कल्पक आणि वैविध्यपूर्ण कलाकृती सादर केल्या. यामध्ये भविष्यातील जगाचे चित्रण, अश्मकालीन युगाची झलक, ब्रह्मांडाची भव्यता, पाण्याखालील जीवन, हम्पी संस्कृतीचे दर्शन, शालीमार बाग, मीनाक्षी मंदिर आणि रायगड किल्ला अशा विविध विषयांवर आधारित एकूण १० कलाकृती अत्यंत देखण्या पद्धतीने उभारण्यात आल्या होत्या.

विद्यार्थ्यांच्या या कलाप्रदर्शनात हार्दिक जैस्वाल या विद्यार्थ्याने स्व. गोदावरी आजी यांचे रेखाटलेले पोर्ट्रेट विशेष आकर्षण ठरले. हे पोर्ट्रेट त्याने डॉ. उल्हास पाटील यांना भेट म्हणून सादर केले. यावेळी न्युरोसर्जरी तज्ज्ञ डॉ. अनिकेत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. कार्यक्रमादरम्यान ‘समन्वय २०२६’चा ट्रेलर स्क्रीनवर प्रदर्शित करण्यात आला, ज्याला उपस्थितांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. डॉ. अनिकेत पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेचे कौतुक करत अशा उपक्रमांमुळे व्यक्तिमत्व विकासास चालना मिळते, असे मत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमित पाटील आणि आस्था भागवत यांनी केले. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी वेदांत दाते, उन्नती खरोडे, हार्दिक जैस्वाल, शुभदा तोडकर, ऋत्वीक भुजबळ आणि मुस्कान सिद्दीकी यांनी विशेष परिश्रम घेतले. १३ एप्रिल रोजी ‘प्रॉम्प नाईट’ हा आकर्षक कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून १४ एप्रिल रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.


Protected Content

Play sound