कासोदा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । उधारीवर घेतलेल्या चादरींचे पैसे वेळेवर परत मागितल्याच्या रागातून एका व्यापाऱ्यावर सहा जणांनी लोखंडी फावडे आणि रॉडने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना कासोदा येथे घडली आहे. या हल्ल्यात फिर्यादी गंभीर जखमी झाले असून, पोलिसांनी याप्रकरणी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कासोदा येथील रहिवासी हसीन खान जमशेर खान (वय ३३) यांचा चादर विक्रीचा व्यवसाय आहे. त्यांनी काही दिवसांपूर्वी आरोपींना २३ हजार रुपयांच्या चादरी उधारीवर दिल्या होत्या. मुदत संपूनही पैसे न मिळाल्याने हसीन खान यांनी शोएब खान मुन्सफ खान याच्याकडे पैशांची विचारणा केली. याचाच राग मनात धरून, ११ एप्रिल रोजी रात्री २१ वाजेच्या सुमारास गरीब नवाज चौक परिसरात आरोपींनी हसीन खान यांच्या दुकानात प्रवेश केला.

संशयित आरोपींनी “पैसे देणार नाही, तुला काय करायचे ते कर” असे म्हणत हसीन खान यांना शिवीगाळ केली. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि आरोपींनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. याच दरम्यान एका आरोपीने लोखंडी फावड्याने हसीन खान यांच्या तोंडावर आणि डोक्यावर गंभीर वार केले. तसेच लोखंडी रॉडने हातापायावर मारहाण करून त्यांना जखमी केले. एवढ्यावरच न थांबता आरोपींनी फिर्यादीच्या गळ्यातील चांदीची चैन तोडून नुकसान केले.
याप्रकरणी हसीन खान यांच्या फिर्यादीवरून कासोदा पोलीस स्टेशनमध्ये शोएब खान मुन्सफ खान, इम्रान खान मुन्सफ खान, इरफान उर्फ इप्पु खान मुन्सफ खान, शाकीब खान मुन्सफ खान, आवेश खान सिद्दीक खान आणि मुन्सफ खान अलीयार खान या सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउपनि धर्मराज वसंतराव पाटील हे करीत आहे. सर्व आरोपींना १२ एप्रिल रोजी रात्री अटक करण्यात आली.



