भडगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भडगाव शहरात क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या १९९ व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करत भव्य मिरवणुकीद्वारे जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. समाजबांधवांच्या मोठ्या उपस्थितीत पार पडलेल्या या सोहळ्याने शहरात उत्सवाचे वातावरण निर्माण झाले.
११ एप्रिल रोजी सकाळी महात्मा फुले चौक येथे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन माळी समाजबांधव तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सामाजिक समता, शिक्षण आणि शेतकरी कल्याणासाठी फुले यांनी केलेल्या कार्याचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाला स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

सायंकाळी सात वाजता सजवलेल्या ट्रॅक्टरवर भक्तिमय गीते वाजवत भव्य मिरवणूक काढण्यात आली. महात्मा फुले चौक येथून सुरू झालेली ही मिरवणूक मेन रोड, बालाजी गल्ली, जागृती चौक, शनी चौक, बाजार चौक आणि खोल गल्ली मार्गे पुन्हा महात्मा फुले चौकात येऊन संपन्न झाली. मिरवणुकीदरम्यान पारंपरिक वेशभूषा, ढोल-ताशांचा गजर आणि घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.
या कार्यक्रमात भडगाव नगरपालिकेचे गटनेते लखिचंद पाटील, नगरसेवक सचिन चोरडिया, देवाजी अहिरे, एकलव्य संघटनेचे रविंद्र सोनवणे, संजय सोनवणे, हर्षल पाटील, निलेश मालपुरे, रवि अहिरे, विजय महाजन तसेच ज्येष्ठ पत्रकार शिवदास महाजन यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. तसेच महात्मा फुले बहुद्देशीय संस्थेचे भिकन महाजन, साहेबराव महाजन, विनोद महाजन आणि इतर सदस्यांनीही सक्रिय सहभाग नोंदविला.
यावेळी मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. महात्मा फुले बहुद्देशीय सेवा मंडळ व माळी पंच मंडळाच्या सर्व सदस्यांनी आयोजनात परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रविण महाजन सर यांनी केले.



