Home क्राईम विनापरवाना सागवान पाटयांची वाहतूक करणारे वाहन जप्त ; चालक फरार

विनापरवाना सागवान पाटयांची वाहतूक करणारे वाहन जप्त ; चालक फरार


यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील पश्चिम वनपरिक्षेत्र विभागाने गुप्त माहितीच्या आधारे केलेल्या धडक कारवाईत विनापरवाना सागवान लाकडाच्या पाटयांची चोरट्या मार्गाने वाहतूक करणारे चारचाकी वाहन जप्त करण्यात आले असून, या प्रकरणातील वाहन चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे.

वनविभागाच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विभागाला मिळालेल्या गुप्त बातमीच्या आधारे नायगाव-किनगाव रस्त्यावर रात्री सुमारे १० वाजता सापळा रचण्यात आला होता. यावेळी संशयित हालचालींवर लक्ष ठेवताना महिंद्रा पिकअप (क्रमांक एमएच ०४ ईएल ७६५८) या वाहनाची तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान प्लास्टिक क्रेटच्या खाली लपवून ठेवलेल्या सागवान जातीच्या चौपाट पाटया आढळून आल्या. एकूण ०.१७७ घनमीटर सागवान लाकूड, ज्याची किंमत ३,९३९ रुपये आहे, असे आढळले.

या कारवाईत संबंधित वाहनाची किंमत ५,२५,००० रुपये असून, एकूण जप्त मुद्देमालाची किंमत ५,२८,९३९ रुपये इतकी आहे. तपासणीदरम्यान चालकाने वाहन सोडून पळ काढला. वनविभागाने वाहनासह संपूर्ण मुद्देमाल घटनास्थळावरून जप्त करून शासकीय काष्ठ आगार, यावल येथे जमा केला आहे.

या प्रकरणी वनपरिक्षेत्र अधिकारी (संरक्षण व अतिक्रमण निर्मूलन), यावल यांनी प्रथम अहवाल क्रमांक ०६/२०२६ दिनांक ११ एप्रिल २०२६ रोजी नोंदविला असून, भारतीय वन अधिनियम १९२७ च्या कलम ४१ (२) (ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर कारवाई उपवनसंरक्षक सौरिष सहाय (यावल वन विभाग, जळगाव) व सहाय्यक वनसंरक्षक समाधान पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या मोहिमेत वनपरिक्षेत्र अधिकारी प्रशांत जोशी (यावल पश्चिम), विपुल पाटील (वाघझिरा), संजय इंडे (हरीपुरा) तसेच वनरक्षक हनुमंत सोनवणे, चेतन शेलार, अक्षय रोकडे, इंदल चव्हाण, मोहन कच्छवाह, आनंद तेली, सरला भोंगरे आणि सीमा भालेराव यांनी सक्रिय सहभाग घेतला.

वनविभागाच्या या कारवाईमुळे अवैध लाकूड तस्करीवर मोठा आळा बसण्याची शक्यता असून, पुढील तपास सुरू आहे आणि फरार चालकाचा शोध घेतला जात आहे.


Protected Content

Play sound