Home पर्यावरण मुक्ताईनगरमध्ये बिबट्याची धडक एन्ट्री ; आ. चंद्रकांत पाटील यांचे नागरिकांना सतर्क राहण्याचे...

मुक्ताईनगरमध्ये बिबट्याची धडक एन्ट्री ; आ. चंद्रकांत पाटील यांचे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन 


मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । रविवार दिनांक १२ रोजी मुक्ताईनगर शहरात बिबट्या घुसल्याची धक्कादायक घटना समोर आली असून या घटनेमुळे संपूर्ण शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सकाळपासूनच बिबट्या शहरात फिरत असल्याच्या अफवा आणि माहिती वेगाने पसरल्याने नागरिकांमध्ये घबराट वाढली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील काही भागात बिबट्या दिसल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले असून, काही ठिकाणी त्याच्या हालचालींचे संकेतही आढळले आहेत. ही बातमी वाऱ्यासारखी पसरताच नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळले असून बाजारपेठेतही शुकशुकाट पाहायला मिळत आहे. विशेषतः लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेबाबत पालक अधिक सतर्क झाले आहेत.

घटनेची माहिती मिळताच आमदार चंद्रकांत पाटील यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी परिस्थितीचा आढावा घेत वनविभाग आणि पोलीस प्रशासनाला त्वरित आवश्यक ती कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. प्रशासनाकडून बिबट्याला सुरक्षितरीत्या पकडण्यासाठी विशेष पथक कार्यरत करण्यात आले असून, दोन तासांच्या आत बिबट्याला जेरबंद करून सुरक्षित ठिकाणी हलवले जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, पोलीस आणि वनविभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. अनावश्यक गर्दी करू नये, अफवांवर विश्वास ठेवू नये आणि प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच बिबट्या दिसल्यास तात्काळ संबंधित विभागांना कळवण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.

सध्या प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असून, नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिले जात आहे. या घटनेमुळे शहरात भीतीचे वातावरण असले तरी लवकरच परिस्थिती नियंत्रणात येईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.


Protected Content

Play sound