यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील भरडधान्य उत्पादक शेतकऱ्यांसाठी किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत रब्बी हंगामातील धान्य खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. शासनाच्या या महत्त्वाच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी विलंब न करता नोंदणी करावी, असे आवाहन कोरपावली विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन राकेश वसंत फेगडे यांनी केले आहे.
शासनाच्या हमीभाव योजनेअंतर्गत यंदा ज्वारीसाठी ३६९९ रुपये प्रति क्विंटल तर मक्यासाठी २४०० रुपये प्रति क्विंटल असा आधारभूत दर निश्चित करण्यात आला आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाला योग्य दर मिळणार असून बाजारातील चढ-उताराचा फटका बसणार नाही, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. नोंदणीची अंतिम मुदत ३० एप्रिल २०२६ निश्चित करण्यात आली असून, वेळेत नोंदणी करणे अत्यावश्यक आहे.

नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रांमध्ये रब्बी हंगाम २०२५-२०२६ चा पीकपेरा नमूद असलेला ७/१२ उतारा, खाते उतारा (८ अ), आधार कार्ड झेरॉक्स, बँक पासबुक झेरॉक्स तसेच आधार लिंक असलेला मोबाईल नंबर यांचा समावेश आहे. ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने बायोमेट्रिक मशीनद्वारे केली जाणार असून शेतकऱ्यांनी स्वतः उपस्थित राहून नोंदणी करणे आवश्यक आहे.
नोंदणीसाठी कोरपावली येथील विविध कार्यकारी सोसायटी, ता. यावल येथे सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. परिसरातील सर्व शेतकरी बांधवांनी या केंद्रावर जाऊन आपली नोंदणी पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. या प्रक्रियेमुळे शेतकऱ्यांना थेट शासनाच्या योजनांचा लाभ मिळणार असून पारदर्शकता राखली जाणार आहे.



