Home Cities जळगाव गोदावरी अभियांत्रिकीत ‘एआय प्रोटोटाईप डेमो डे’ उत्साहात

गोदावरी अभियांत्रिकीत ‘एआय प्रोटोटाईप डेमो डे’ उत्साहात


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगावातील गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील विद्यार्थ्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पनांना व्यासपीठ देणारा ‘एआय प्रोटोटाईप डेमो डे’ उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या अत्याधुनिक प्रकल्पांनी केवळ तांत्रिक कौशल्यच नव्हे, तर सामाजिक समस्यांवर उपाय शोधण्याची क्षमता देखील अधोरेखित केली.

गोदावरी फाऊंडेशन संचलित महाविद्यालयातील कृत्रिम बुद्धिमत्ता व डेटा सायन्स विभागातर्फे हा उपक्रम इनोव्हेशन कौन्सिल अंतर्गत आयोजित करण्यात आला होता. तृतीय वर्ष एआयडीएस शाखेतील विद्यार्थ्यांनी विविध अभिनव प्रकल्प सादर करत आपल्या कल्पकतेची आणि संशोधनात्मक दृष्टिकोनाची झलक दाखवली. अनेक प्रकल्पांनी प्रत्यक्ष जीवनातील समस्यांवर तंत्रज्ञानाच्या मदतीने परिणामकारक उपाय सुचवले.

या स्पर्धेत प्रथम क्रमांक सत्यम महाजन यांच्या ‘एआय बेस स्मार्ट व्होटींग सिस्टीम’ या प्रकल्पाने पटकावला. या प्रणालीद्वारे मतदान प्रक्रिया अधिक सुरक्षित, जलद आणि पारदर्शक करण्यावर भर देण्यात आला आहे. फेस रिकग्निशन आणि ओटीपीच्या माध्यमातून मतदारांची अचूक ओळख पटवणे, डुप्लिकेट मतदान रोखणे तसेच रिअल-टाइम अॅनालिटिक्सद्वारे निकालांचा अंदाज देण्याची सुविधा या प्रणालीत उपलब्ध आहे.

द्वितीय क्रमांकाचा मान हर्षा धांडे, मिनाज पिंजारी, तरन्नुम पिंजारी आणि एफाज खाटीक यांच्या ‘एआय न्यूज अॅप्लिकेशन’ प्रकल्पाला मिळाला. या अॅपच्या सहाय्याने वापरकर्त्यांना त्यांच्या आवडीनुसार ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या एआयद्वारे फिल्टर करून मिळतात. त्यामुळे वेळेची बचत होत असून अधिक अचूक व संबंधित माहिती सहज उपलब्ध होते.

तृतीय क्रमांक आकाश जाधव आणि तेजस जाधव यांच्या ‘एआय बेस रिझ्युम स्क्रिनिंग सिस्टीम’ प्रकल्पाने मिळवला. या प्रणालीमुळे कंपन्यांना मोठ्या प्रमाणावर आलेल्या रिझ्युममधून योग्य उमेदवारांची निवड जलद आणि अचूक पद्धतीने करता येते. एआयच्या मदतीने उमेदवारांच्या कौशल्यांचे विश्लेषण करून योग्य नोकरीसाठी जुळवणी करण्यात ही प्रणाली सहाय्यभूत ठरते.

इतर विद्यार्थ्यांनीही विविध विषयांवर प्रभावी प्रकल्प सादर करत आपली तांत्रिक क्षमता सिद्ध केली. या सर्व प्रकल्पांचे प्राध्यापक आणि तज्ज्ञांनी विशेष कौतुक केले. विद्यार्थ्यांनी केवळ सैद्धांतिक ज्ञानावर न थांबता त्याचा प्रत्यक्ष जीवनातील उपयोग कसा करता येतो, हे प्रभावीपणे दाखवून दिले.

या उपक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील, शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. तुषार कोळी यांचे मार्गदर्शन लाभले. विभागप्रमुख डॉ. अनिलकुमार विश्वकर्मा यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. जयश्री पाटील असून प्रा. रेश्मा अत्तरदे, प्रा. सेजल गुजराथी आणि प्रा. दिशा साळुंके यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

या यशस्वी आयोजनाबद्दल गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील, सदस्य डॉ. केतकी पाटील, तसेच डॉ. वैभव पाटील आणि डॉ. अनिकेत पाटील यांनी समाधान व्यक्त करत विद्यार्थ्यांच्या नवोपक्रमशीलतेचे कौतुक केले. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये संशोधन, नवोपक्रम आणि उद्योजकतेची भावना अधिक दृढ होत असून समाजोपयोगी तंत्रज्ञान विकासाला चालना मिळणार आहे.


Protected Content

Play sound