Home Cities जळगाव सीईओ करिश्मा नायर यांनी स्वीकारला पदभार

सीईओ करिश्मा नायर यांनी स्वीकारला पदभार


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्हा परिषदेच्या नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी शुक्रवार, दि. १० एप्रिल रोजी पदभार स्वीकारताच कामकाजात वेग आणण्याचा स्पष्ट संदेश दिला. पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्याच दिवशी त्यांनी सर्व विभागांना भेटी देत प्रत्यक्ष आढावा घेतल्याने प्रशासनात ‘ॲक्शन मोड’ची सुरुवात झाल्याचे चित्र दिसून आले.

जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी यांच्या हस्ते करिश्मा नायर यांनी पदभार स्वीकारला. यावेळी जिल्हा परिषदेचे सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते. माजी मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांची मुंबई येथे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या अभियान संचालकपदी बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी करिश्मा नायर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी त्या नाशिक महानगरपालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून कार्यरत होत्या.

शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय इमारतीतील दालनात त्यांनी पदभार स्वीकारताच कामकाजाला सुरुवात केली. कोणतीही विलंब न लावता त्यांनी प्रशासनाच्या विविध घटकांची माहिती घेण्यास प्राधान्य दिले.

पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी जिल्हा परिषदेच्या नवीन आणि जुन्या अशा दोन्ही इमारतीतील सर्व विभागांना प्रत्यक्ष भेटी दिल्या. प्रत्येक विभागातील टेबलवर जाऊन अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संवाद साधत त्यांनी कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी त्यांनी प्रलंबित कामे, अडचणी आणि प्राधान्याच्या योजना याबाबत माहिती घेत मार्गदर्शनही केले.

या दौऱ्यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक आर. एस. लोखंडे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज चौधरी यांच्यासह सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते. नव्या सीईओंच्या सक्रियतेमुळे कर्मचारीवर्गात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

करिश्मा नायर यांच्या सकारात्मक आणि तत्पर कामकाजाच्या पद्धतीमुळे जिल्हा परिषदेच्या विविध योजनांना आणि विकासकामांना गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली प्रशासन अधिक गतिमान होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.


Protected Content

Play sound