मुंबई – वृत्तसेवा । इंडियन प्रीमियर लीगमध्ये यंदा एका नव्या युवा खेळाडूने सर्वांचे लक्ष वेधून घेतले असून, राजस्थान रॉयल्सचा सलामीवीर वैभव सूर्यवंशी ‘सिक्सर किंग’ म्हणून उदयास आला आहे. त्याने आपल्या स्फोटक फलंदाजीच्या जोरावर केवळ चाहत्यांनाच नव्हे तर क्रिकेट तज्ज्ञांनाही थक्क केले आहे.
राजस्थान रॉयल्स कडून खेळताना वैभव सूर्यवंशी याने मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात अवघ्या १४ चेंडूत ३९ धावांची आक्रमक खेळी साकारली. या खेळीत त्याने तब्बल ५ षटकार ठोकत मैदानावर धडाकेबाज कामगिरी केली. त्याच्या या खेळीमुळे सामना रंगतदार झाला आणि त्याने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला.

वयाच्या केवळ १५व्या वर्षीच वैभव सूर्यवंशी याने IPL इतिहासात २० वर्षांखालील खेळाडूंमध्ये सर्वाधिक षटकार ठोकण्याचा विक्रम प्रस्थापित केला आहे. याआधी हा विक्रम ईशान किशन आणि ऋषभ पंत यांच्या नावावर होता, परंतु सूर्यवंशीने आपल्या स्फोटक शैलीने त्यांना मागे टाकले आहे.
IPL सारख्या जगातील सर्वात मोठ्या टी-२० स्पर्धेत एवढ्या कमी वयात अशी कामगिरी करणे ही मोठी गोष्ट मानली जात आहे. आपल्या अल्प कारकिर्दीतच सूर्यवंशीने ३५ षटकार ठोकत ‘सिक्सर किंग’ ही ओळख निर्माण केली आहे. त्याच्या खेळीतली आक्रमकता, आत्मविश्वास आणि टायमिंग पाहता तो भविष्यात भारतीय क्रिकेटचा मोठा स्टार ठरू शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
या युवा खेळाडूच्या कामगिरीमुळे राजस्थान रॉयल्स संघालाही मोठी ताकद मिळाली असून, आगामी सामन्यांमध्ये त्याच्याकडून आणखी दमदार खेळीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. चाहत्यांमध्येही त्याच्या खेळीबद्दल प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.



