धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस नयूज प्रतिनिधी । धरणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जांभोरा शिवारात पशुचोरांनी धुमाकूळ घातला असून, एका रात्रीत तब्बल १० जनावरांची चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. यामध्ये गाई, बोकड, बकऱ्या आणि आवट यांचा समावेश असून, एकूण ६७,००० रुपयांचे पशुधन चोरीला गेल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जांभोरा येथील रहिवासी रमाकांत जुलाल पवार (वय ३२) यांची जांभोरा शिवारातील शेत गट क्रमांक १९२ मध्ये जनावरे बांधलेली होती. ५ एप्रिलच्या सायंकाळी ५ वाजेपासून ते ६ एप्रिलच्या सकाळी ७ वाजेच्या दरम्यान, अज्ञात चोरट्यांनी शेतात प्रवेश करत चोरट्यांनी गोठ्यातील विविध प्रकारची १० जनावरे चोरून नेली.

याप्रकरणी रमाकांत पवार यांनी धरणगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ जनार्दन पाटील हे करीत आहे.



