Home Uncategorized सावखेडे शिवारातील बुद्धविहाराभोवती सांडपाणी; प्रशासनावर तीव्र नाराजी

सावखेडे शिवारातील बुद्धविहाराभोवती सांडपाणी; प्रशासनावर तीव्र नाराजी


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । सावखेडे शिवारातील कोल्हे परिसरातील संविधान नगरात उभारलेल्या बुद्धविहारात सांडपाणी साचत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला असून, यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. श्रद्धा, स्वाभिमान आणि एकात्मतेचे प्रतीक असलेल्या या पवित्र स्थळाची अशी दुर्दशा झाल्याने समाजबांधवांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.

परिसरातील गटार तुंबल्यामुळे सांडपाणी थेट बुद्धविहाराच्या आवारात शिरत आहे. विहारासमोरील चेंबर ब्लॉक झाल्याने घाण पाणी ओसंडून बाहेर येत असून, संपूर्ण परिसरात दुर्गंधी पसरली आहे. या प्रकारामुळे विहाराची पवित्रता जणू काही धोक्यात आली आहे.

दरवर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त याच ठिकाणाहून उत्सवाची सुरुवात होते. हजारो अनुयायी येथे एकत्र येऊन अभिवादन करतात व प्रेरणा घेतात. मात्र, सध्या निर्माण झालेल्या अस्वच्छतेमुळे नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

स्थानिकांच्या मते, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळेच ही परिस्थिती उद्भवली आहे. वेळेवर गटारांची स्वच्छता आणि दुरुस्ती न केल्याने सांडपाणी थेट विहारात शिरत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पवित्र स्थळांची स्वच्छता राखणे ही प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी असतानाही ती पार पाडली जात नसल्याची टीका होत आहे.


Protected Content

Play sound