Home Cities जळगाव महापालिकेची महासभा १५ एप्रिल रोजी; नामनिर्देशित सदस्यांच्या निवडीसह विविध प्रस्ताव चर्चेला

महापालिकेची महासभा १५ एप्रिल रोजी; नामनिर्देशित सदस्यांच्या निवडीसह विविध प्रस्ताव चर्चेला


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव महापालिकेची महासभा बुधवारी, १५ एप्रिल रोजी महापौर दिपमाला काळे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली आहे. या सभेत राजकीय नियुक्त्यांपासून ते शहराच्या पायाभूत सुविधांपर्यंतच्या एकूण १२ विषयांवर महत्त्वपूर्ण चर्चा होऊन निर्णय घेतले जाणार आहेत.

या महासभेत सर्वांत महत्त्वाचा विषय म्हणजे महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीनुसार, पक्षांच्या तौलनिक संख्याबळानुसार सात रिक्त जागांसाठी नामनिर्देशित सदस्यांची निवड करण्यात येणार आहे. आयुक्तांच्या शिफारशींनुसार या नावांवर शिक्कामोर्तब होईल.यात भाजपतर्फे चार, शिंदे शिवसेनातर्फे दोन व उबठा सेनेतर्फे एक सदस्यांची निवड जाहिर करण्यात येणार आहे. तसेच, प्रशासकीय कामाचा वेग वाढवण्यासाठी सेवानिवृत्त अधिकाऱ्यांच्या सेवा करार पद्धतीने घेण्याबाबतचा प्रस्तावही सभेसमोर ठेवण्यात आला आहे.

शहराच्या नियोजनाच्या दृष्टीने, प्रभाग समित्यांचे पुनर्गठन आणि जळगाव शहराच्या एकत्रित सुधारित प्रारुप विकास योजनेला (DP Plan) मुदतवाढ देण्याबाबतचे प्रस्ताव या सभेत चर्चेला येतील. पावसाळा जवळ येत असल्याने शहरातील प्रमुख नाले व उपनाल्यांची मान्सूनपूर्व साफसफाई करण्याच्या कामाला गती देण्याबाबतही निर्णय घेतला जाणार आहे. आरोग्य आणि सुविधांच्या आघाडीवर, मेहरुण परिसरातील टी.बी.एस. हॉस्पिटल जवळ डॉग शेल्टर, हेल्थ क्लिनिक आणि फूड स्टोअर उभारण्याच्या ५१ लाखांच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय, शहरातील पथदिव्यांच्या देखभालीसाठी धोरणात्मक निर्णय घेणे आणि ‘जैविक विविधता व्यवस्थापन समिती’ गठीत करणे हे विषयही अजेंड्यावर आहेत.

महासभेत मांडण्यात आलेल्या अशासकीय प्रस्तावांमध्ये भावनिक आणि विकासकामांच्या मुद्द्यांचा समावेश आहे. रामेश्वर कॉलनी विकास फाउंडेशनच्या मागणीनुसार, स्वामी समर्थ चौकात छत्रपती संभाजी महाराज यांचा भव्य पुतळा उभारण्याबाबत चर्चा होणार आहे. तसेच, शिवाजी नगर येथील उड्डाणपुलाला ‘छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपुल’ आणि रिंगरोड ते कानळदा रोड उड्डाणपुलाला ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर उड्डाणपुल’ असे नाव देण्याबाबतचे प्रस्तावही सदस्यांनी मांडले आहेत. पिंप्राळा रेल्वे उड्डाणपुलाजवळ सर्कल विकसित करणे आणि नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींसाठी दोन दिवसांचे प्रशिक्षण आयोजित करणे, या विषयांवरही या सभेत सविस्तर खल होणार आहे.

 


Protected Content

Play sound