धुळे-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । धुळे येथे महाराष्ट्र विज्ञान समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेला “जमनाबेन कुटमुटिया लोकसेवक पुरस्कार” सोहळा उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला. समाजसेवा, शिक्षण आणि गांधीवादी विचारांचा वारसा जपणाऱ्या कार्यकर्त्यांचा सन्मान करताना या सोहळ्याने उपस्थितांना नवी दिशा दिली.
बर्वे छात्रालय येथे पार पडलेल्या या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली. व्यासपीठावर उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एन. के. ठाकरे, नगरसेविका व स्थायी समिती सभापती बालीबेन मंडोरे, ज्येष्ठ पत्रकार व संपादक रमेश दाणे, वक्ते शंभू पाटील तसेच गांधी रिसर्च फाउंडेशनचे समन्वयक उदय महाजन उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना रमेश दाणे यांनी साने गुरुजी, विनोबा भावे, कर्मवीर भाऊराव पाटील आणि गाडगेबाबा यांच्या विचारांचा उल्लेख करत या भूमीची प्रेरणादायी परंपरा अधोरेखित केली.

कार्यक्रमाची सुरुवात नाझनीन शेख यांनी ‘वैष्णव जनतो तेने कहिये जे’ या भावगीताने केली. डॉ. वैभव जोशी यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाची रूपरेषा मांडली, तर जगदीश देवपूरकर यांनी उपस्थित मान्यवरांचा परिचय करून दिला. कार्यक्रमात ‘महात्मा गांधी आणि अहिंसा’ या विषयावर शंभू पाटील यांनी प्रभावी व्याख्यान दिले. त्यांनी सांगितले की, आजच्या युद्धजन्य परिस्थितीत गांधीजींच्या अहिंसेचा विचार काहीसा दुर्लक्षित होत असला तरी तो अधिकच महत्त्वाचा ठरतो. महात्मा गांधी यांनी गौतम बुद्ध आणि महावीर यांच्या विस्मृतीत गेलेल्या अहिंसेच्या तत्वज्ञानाला नव्याने अधोरेखित केले, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या सोहळ्यात रामधीरजजी यांना “जमनाबेन कुटमुटिया लोकसेवक पुरस्कार” प्रदान करण्यात आला. सन्मानपत्राचे वाचन कल्पतेश देशमुख यांनी केले. पुरस्कार प्रदान करणारे माजी कुलगुरू डॉ. एन. के. ठाकरे यांनी उपस्थितांशी संवाद साधत समाजसेवेतील मूल्यांची जपणूक करण्याचे महत्त्व सांगितले.
सत्काराला उत्तर देताना रामधीरजजी यांनी जागतिक परिस्थितीवर भाष्य केले. त्यांनी सांगितले की, आजच्या काळातील युद्धांमुळे गंभीर नैतिक प्रश्न निर्माण होत आहेत. लोकशाही व्यवस्थांमध्ये बाह्य हस्तक्षेप, शस्त्रास्त्रांवर होणारा प्रचंड खर्च आणि विकासासाठी आवश्यक असलेल्या निधीचा अभाव ही चिंतेची बाब आहे. इतिहासात युद्धांचे शेवट संवादातूनच होतात, त्यामुळे सुरुवातीपासूनच शांततेचा मार्ग स्वीकारणे अधिक योग्य ठरले असते, असा विचार त्यांनी मांडला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैद्य विजय कळमकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन वैद्य अपश्चिम बरंठ यांनी मानले. या सोहळ्यामुळे समाजसेवेच्या कार्याला नवी प्रेरणा मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.



