यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्हा महसूल सेवक संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी विशाल उज्जैनसिंग राजपूत यांची बिनविरोध निवड करण्यात आल्याने संघटनेत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. शिरसाळा (ता. बोदवड) येथे पार पडलेल्या भव्य मेळावा व बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला.
शिरसाळा येथे आयोजित या बैठकीस जिल्ह्यातील सर्व तालुकाध्यक्षांसह मोठ्या संख्येने महसूल सेवक उपस्थित होते. संघटनेचे विद्यमान जिल्हाध्यक्ष जितेश चौधरी यांची पदोन्नती झाल्यामुळे त्यांचा कार्यकाळ संपुष्टात आला होता. त्यामुळे नव्या जिल्हाध्यक्षांच्या निवडीसाठी ही महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती. राज्याध्यक्ष नामदेव शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली आणि निवड प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबविण्यात आली.

जिल्हाध्यक्ष पदासाठी नामनिर्देशन मागविण्यात आल्यानंतर संपूर्ण जळगाव जिल्ह्यातून एकमेव अर्ज विशाल उज्जैनसिंग राजपूत यांचा प्राप्त झाला. अन्य कोणताही अर्ज न आल्यामुळे उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांनी आणि सदस्यांनी एकमुखाने त्यांच्या नावाला समर्थन दिले. परिणामी, विशाल राजपूत यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.
निवड जाहीर होताच नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष विशाल राजपूत यांनी तत्काळ जिल्हा कार्यकारिणीची घोषणा केली. यात जिल्हा उपाध्यक्षपदी अरुण पाटील, जिल्हा सचिवपदी देवेंद्र जाधव यांची नियुक्ती करण्यात आली. फैजपूर विभागीय अध्यक्षपदी महेंद्र चौधरी, भुसावळ विभागीय अध्यक्षपदी रवींद्र धांडे, जळगाव विभागीय अध्यक्षपदी विजय पाटील, एरंडोल विभागीय अध्यक्षपदी जितेंद्र बडगुजर, पाचोरा विभागीय अध्यक्षपदी ईश्वर पाटील आणि अमळनेर विभागीय अध्यक्षपदी चंद्रकांत सरदार यांची निवड करण्यात आली. तसेच जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून नवल सानप, जिल्हा सरचिटणीस म्हणून ज्ञानेश्वर सुरडकर, जिल्हा खजिनदार म्हणून प्रशांत सरोदे, जिल्हा संघटक म्हणून कुलदीप पाटील, प्रसिद्धीप्रमुख म्हणून किरण पाटील आणि महिला जिल्हाध्यक्ष म्हणून वर्षाली पाटील यांची निवड करण्यात आली.
या कार्यक्रमाला राज्य कोअर कमिटी अध्यक्ष डॉ. दिलीप साळवे, राज्य उपाध्यक्ष प्रवीण चीखलकर तसेच बुलढाणा जिल्हाध्यक्ष पंडित इंगळे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. या वेळी जळगाव जिल्ह्यातील सुमारे २०० महसूल सेवक उपस्थित राहून संघटनेच्या पुढील वाटचालीसाठी एकजूट दर्शविली.



