पहूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील मालखेडा येथील एका तरुणाची त्याच्याच पत्नीने आणि तिच्या नातेवाईकांनी मिळून फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. महिलेने आपले पहिले लग्न झालेले असतानाही ती माहिती लपवून पिडीत तरूणाशी दुसरे लग्न केले आणि त्यानंतर घरातून ४ तोळे सोन्याचे दागिने व ३ लाख रुपये रोख घेऊन पोबारा केला. याप्रकरणी पहूर पोलीस ठाण्यात ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुनील रामलाल नाईक (वय ३०, रा. मालखेडा, ता. जामनेर) यांचा विवाह मीनाक्षी आजमल जाधव हिच्याशी झाला होता. लग्नापूर्वी मीनाक्षीचे आधीच एक लग्न झालेले होते, मात्र ही वस्तुस्थिती तिने आणि तिच्या कुटुंबीयांनी सुनील नाईक यांच्यापासून जाणीवपूर्वक लपवून ठेवली. लग्नानंतर काही दिवसांनी मीनाक्षीने तिच्या वडिलांची प्रकृती खराब असल्याचे खोटे कारण सांगितले. या भावनिक विवंचनेत असलेल्या पतीचा विश्वास संपादन करून तिने घरातील ४ तोळे सोन्याचे दागिने आणि ३ लाख रुपये रोख हस्तगत केले.

काही दिवसांनी मीनाक्षीचे पहिले लग्न झाल्याचे सत्य सुनील यांच्या समोर आले. आपली आर्थिक आणि मानसिक फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसांत धाव घेतली. या तक्रारीवरून मीनाक्षी आजमल जाधव, आजमल जोहारसिंग जाधव, अरुणा आजमल जाधव, रणजित आजमल जाधव, महेश आजमल जाधव आणि गजानन जोहारसिंग जाधव (सर्व रा. वडगांव नालबंदी, ता. भडगाव, सध्या रा. कल्याण, जि. ठाणे) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नंदकुमार शिंब्रे हे करीत आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, लग्नाचे संबंध जोडताना नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.



