नवी दिल्ली-वृत्तसेवा । सीबीएसई बोर्डाने नवीन शिक्षणक्रम जाहीर करत विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे बदल लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार पुढील शैक्षणिक वर्षापासून इयत्ता सहावीपासून तीन भाषा शिकणे अनिवार्य करण्यात येणार असून, नववीपासून गणित आणि विज्ञान विषयांसाठी द्विस्तरीय परीक्षा पद्धती लागू करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे देशभरातील सीबीएसई शाळांमधील शिक्षण पद्धतीत मोठा बदल होणार आहे.
नवीन धोरणानुसार, इयत्ता सहावीपासून विद्यार्थ्यांना तीन भाषा शिकाव्या लागतील. यामध्ये दोन भाषा भारतीय असणे बंधनकारक राहणार असून, तिसरी भाषा विद्यार्थ्यांना उपलब्ध ४२ भाषांपैकी निवडावी लागणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या भाषिक क्षमतेत वाढ होण्यासोबतच विविध संस्कृतींचे ज्ञान मिळण्यास मदत होईल, असा बोर्डाचा विश्वास आहे.

आतापर्यंत बहुतेक शाळांमध्ये दोनच भाषा अनिवार्य होत्या, मात्र आता एक अतिरिक्त भाषा शिकणे बंधनकारक केल्याने विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचा व्याप वाढणार आहे. त्याचबरोबर नवीन भाषा शिकण्याची संधी मिळाल्याने विद्यार्थ्यांची विचारशक्ती आणि समज वाढेल, असेही तज्ज्ञांचे मत आहे. विशेष बाब म्हणजे परदेशातून भारतातील सीबीएसई शाळांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना तीन भाषांच्या अटीतून सूट देण्यात येणार आहे.
सीबीएसईने केवळ भाषांपुरतेच नव्हे, तर मूल्यांकन पद्धतीतही बदल केला आहे. नववीपासून गणित आणि विज्ञान विषयांसाठी पारंपरिक ८० गुणांच्या परीक्षेसोबतच २५ गुणांची स्वतंत्र परीक्षा देण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. या परीक्षेत विद्यार्थ्यांच्या आकलन क्षमतेची सखोल चाचणी घेतली जाणार असून, या गुणांची स्वतंत्र नोंद गुणपत्रिकेत करण्यात येणार आहे.
इयत्ता सहावी ते आठवी हा टप्पा ‘मिडल स्टेज’ म्हणून मानला जात असून, याच काळात तिसऱ्या भाषेचा पाया मजबूत करण्यावर भर दिला जाणार आहे. अनेक विद्यार्थ्यांसाठी तिसरी भाषा पूर्णपणे नवीन असू शकते, त्यामुळे ती समजून घेण्यासाठी, बोलण्यासाठी आणि लिहिण्यासाठी पुरेसा वेळ देण्याचा उद्देश या धोरणामागे आहे.
सीबीएसईच्या मते, भाषा ही केवळ अभ्यासाचा विषय नसून ती संस्कृती आणि समाजाशी जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे. भारतातील विविध भाषांचे ज्ञान मिळाल्याने विद्यार्थ्यांना देशाची सांस्कृतिक विविधता अधिक चांगल्या प्रकारे समजेल आणि राष्ट्रीय एकात्मतेची भावना अधिक दृढ होईल.



