
भुसावळ लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरात वाढत्या चोऱ्यांच्या पार्श्वभूमीवर भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. फातेमा कॉलनीतील एका बंद घरातून ५ लाख ७० हजार रुपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम लांबवणाऱ्या आरोपीला डी.बी. पथकाने अवघ्या दोन दिवसांत अटक केली आहे. अशी माहिती पोलीस अधिक्षक कार्यालयातील जनसंपर्क विभागाने दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी वसीम अहमद अब्दुल बासीद शेख (रा. फातेमा कॉलनी, भुसावळ) हे २८ मार्च ते ३० मार्च दरम्यान आपल्या घराला कुलूप लावून बाहेरगावी गेले होते. या संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने घरफोडी करून घरातील किंमती ऐवज चोरून नेला होता. याप्रकरणी ३० मार्च रोजी बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
जळगावचे पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी आणि अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांनी तपासाचे आदेश दिले होते. त्यानुसार डी.बी. पथकातील उपनिरीक्षक राजू सांगळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तांत्रिक माहिती आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने तपास सुरू केला. तपासादरम्यान मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार, पोलिसांनी अमीर खान हबीब खान (वय ३५, रा. न्यू ईदगा जवळ, भुसावळ) याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता, त्याने एका अल्पवयीन मुलाच्या मदतीने ही घरफोडी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपीकडून ४ लाख ९९ हजार १०० रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. न्यायालयाने संशयित आरोपीला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजू सांगळे हे करीत आहे.



