पारोळा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मार्च महिन्यात सहकारी संस्थांसमोर उभ्या राहणाऱ्या कर्जवसुलीच्या आव्हानात पारोळा तालुक्यातील म्हसवे आणि उंदीरखेडे या संस्थांनी १०० टक्के वसुली करत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या कामगिरीमुळे तालुक्यात सहकार क्षेत्रात एक नवा आदर्श निर्माण झाला असून, शिस्त, विश्वास आणि सातत्यपूर्ण परिश्रम यांचे हे उत्तम उदाहरण ठरले आहे.
३१ मार्च अखेर बँकेमार्फत वितरित करण्यात आलेल्या कर्जाची संपूर्ण वसुली करून या दोन्ही संस्थांनी विक्रम नोंदवला आहे. तसेच चालू आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये तालुक्यात बँकेमार्फत थेट व संस्थेमार्फत करण्यात आलेल्या कर्जवाटपाची तब्बल ९४ टक्के वसुली झाल्याने संपूर्ण तालुक्यात समाधान व्यक्त होत आहे. सहकार क्षेत्रातील या यशामुळे आर्थिक शिस्तीचे महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले आहे.

या उल्लेखनीय कामगिरीबद्दल जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष तथा एरंडोल विधानसभा मतदारसंघाचे आमदार ॲड. अमोल पाटील यांच्या हस्ते संबंधित संस्थांच्या पदाधिकाऱ्यांचा व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सहाय्यक निबंधक, विभागीय व्यवस्थापक, क्षेत्रीय अधिकारी तसेच चेअरमन, उपाध्यक्ष, सचिव आणि संचालक मंडळ उपस्थित होते.
कार्यक्रमाला पारोळा नगरपरिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष चंद्रकांत पाटील, सहाय्यक निबंधक महाले, विभागीय व्यवस्थापक विलास बोरसे, क्षेत्रीय अधिकारी एस.एस. महाजन, एस.जी. पाटील, पी.एम. पाटील, सी.जी. पाटील, एम.जी. पाटील, एस.जी. पवार, ज्येष्ठ सचिव राजूदादा परदेशी, नगरसेवक पंकज मराठे, शेतकी संघाचे संचालक साहेबराव पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार अमोल पाटील यांनी सांगितले की, १०० टक्के कर्जवसुली साध्य करणे हे केवळ आकडेवारी नसून त्यामागे संस्थेचे पदाधिकारी, बँक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे अथक परिश्रम, शिस्तबद्ध कामकाज आणि परस्परांतील विश्वास यांचा मोठा वाटा असतो. म्हसवे आणि उंदीरखेडे यांसारख्या मोठ्या गावांमध्ये ही कामगिरी करणे सोपे नसतानाही सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करून हे यश मिळवले, ही बाब निश्चितच अभिमानास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले.
याचबरोबर सेवासमाप्तीनंतरही सुमारे ८० टक्के कर्मचारी जिल्हा बँकेच्या कामकाजात सक्रिय राहून योगदान देत असल्याचेही यावेळी अधोरेखित करण्यात आले. वयोमर्यादा न मानता त्यांनी संस्थांना १०० टक्के वसुलीकडे नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली असून, त्यांच्या कार्याचे विशेष कौतुक करण्यात आले.



