Home प्रशासन नगरपालिका मुक्ताईनगर नगरपंचायतीच्या सर्वसाधारण सभेत २३४ विषयांना मंजुरी

मुक्ताईनगर नगरपंचायतीच्या सर्वसाधारण सभेत २३४ विषयांना मंजुरी


मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर नगरपंचायतीची सर्वसाधारण सभा सोमवार, ३० मार्च रोजी नगराध्यक्षा संजना चंद्रकांतभाऊ पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नगरपंचायत सभागृहात सकाळी ११ वाजता पार पडली. या सभेत तब्बल २८८ विषय मांडण्यात आले होते, त्यापैकी २३४ विषयांना मंजुरी देण्यात आली असून उर्वरित विषयांना प्रशासकीय कारणास्तव स्थगिती देण्यात आली आहे.

सभेत मंजूर झालेल्या महत्त्वाच्या विषयांमध्ये मुक्ताईनगर येथील नाथ जोगी समाज बांधवांसाठी ‘श्री नवनाथ बहुउद्देशीय सामाजिक सभागृह’ उभारण्याच्या ठरावाला पुनर्वसन अंतर्गत मंजुरी देण्यात आली. याबाबत विधानसभेचे आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांनी यापूर्वीच सभेत हा ठराव मंजूर होईल, असा विश्वास व्यक्त केला होता. त्यानुसार आजच्या सभेत या ठरावाला अधिकृत मान्यता मिळाल्याने जोगी समाजामध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

या प्रसंगी लक्ष्मणनाथ जोगी, मोतीलाल जोगी, संदीप जोगी, राकेश जोगी यांची उपस्थिती होती. तसेच सभेला उपनगराध्यक्षा देवयानी निलेश शिरसाट, सर्व नगरसेवक व नगरसेविका, मुख्याधिकारी दीपक पुदाके, कार्यालयीन अधीक्षक पंकज सूर्यवंशी तसेच नगरपंचायतीचे कर्मचारी उपस्थित होते.

दरम्यान, सभेमध्ये मुक्ताईनगर शहरातील आठवडे बाजार व दैनिक बाजाराचा लिलावही पार पडला. या लिलाव प्रक्रियेत नऊ मक्तेदारांनी सहभाग घेतला होता. यामध्ये मक्तेदार मधुकर भिकनजी जाधव यांनी आठवडे बाजाराचा लिलाव १३ लाख ८० हजार रुपयांना तर दैनिक बाजाराचा लिलाव ७ लाख ८६ हजार रुपयांना घेतला.

एकूणच, विविध विकासकामांशी संबंधित विषयांना मंजुरी देत ही सभा महत्त्वपूर्ण ठरली असून शहराच्या पायाभूत सुविधांच्या विकासाला गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


Protected Content

Play sound