दिल्ली-वृत्तसेवा । राजधानी दिल्लीमध्ये मोठा दहशतवादी कट उधळण्यात सुरक्षा यंत्रणांना यश आले असून लष्कर-ए-तोयबाशी संबंधित शब्बीर अहमद लोन याला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. हा आरोपी भारतात नवीन दहशतवादी मॉड्यूल उभारण्याच्या प्रयत्नात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या कारवाईमुळे संभाव्य मोठा हल्ला टळल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने केलेल्या या कारवाईत शब्बीर अहमद लोन हा मेट्रो पोस्टर प्रकरणातील मुख्य सूत्रधार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणात आधी अटक करण्यात आलेल्या आरोपींशी त्याचा थेट संपर्क होता आणि संपूर्ण नेटवर्क तोच नियंत्रित करत होता. सध्या सुरक्षा यंत्रणा त्याची सखोल चौकशी करत असून या कटाचे इतर पैलू उलगडण्याचा प्रयत्न सुरू आहे.

प्राथमिक तपासात लोनचा बांगलादेशाशी असलेला संबंध उघड झाला आहे. तो तेथून कार्यरत राहून भारतात लष्कर-ए-तोयबाचे नवीन मॉड्यूल स्थापन करण्याच्या तयारीत होता. पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयच्या इशाऱ्यावरून तो काम करत असल्याची माहिती समोर आली आहे. गुप्त माहितीनुसार त्याला दिल्ली सीमेवर पकडण्यात आले.
या दहशतवादी गटाने दिल्लीपासून कोलकात्यापर्यंत अनेक ठिकाणी भारतविरोधी पोस्टर्स लावल्याचेही उघड झाले आहे. या पोस्टर्समध्ये दहशतवादी बुरहान वानीचे उदात्तीकरण करण्यात आले होते तसेच “भारत, नरसंहार थांबवा आणि काश्मीरला मुक्त करा” अशा भडकाऊ घोषणांचा वापर करण्यात आला होता. या माध्यमातून समाजात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
तपासादरम्यान बनावट आधार कार्डसह इतर कागदपत्रांचा वापर करून आरोपींना भारतात लपवून ठेवण्यात आले होते. एनक्रिप्टेड अॅप्सच्या माध्यमातून संवाद साधला जात होता आणि विविध शहरांमध्ये टेहळणीही करण्यात आली होती. विशेष म्हणजे शब्बीर अहमद लोन याला यापूर्वी 2007 मध्येही दिल्ली पोलिसांनी शस्त्रांसह अटक केली होती. त्यानंतर तो जामिनावर सुटून बांगलादेशात पळून गेला होता आणि तेथूनच त्याने पुन्हा दहशतवादी कारवाया सुरू केल्या.
तपास यंत्रणांच्या मते, हे मॉड्यूल भारतातील संवेदनशील ठिकाणांवर मोठे हल्ले करण्याच्या तयारीत होते. लाल किल्ल्यासारख्या महत्त्वाच्या स्थळांवर हल्ल्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र दिल्ली पोलिसांनी वेळीच कारवाई करत हा कट उधळला आणि संभाव्य मोठा धोका टाळला.



