जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरात अवैध शस्त्र तस्करी आणि गुन्हेगारी कारवायांविरोधात पोलिसांनी कंबर कसली असून, जळगाव एमआयडीसी पोलिसांनी कुसुंबा शिवारात एक मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी तिघांना अटक केली असून त्यांच्याकडून दोन गावठी कट्टे, जिवंत काडतुसे आणि एक महागडी दुचाकी असा एकूण १ लाख ३३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. एमआयडीसी पोलीसात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव-संभाजीनगर रोडवरील एअरपोर्टच्या समोर असलेल्या नेस पार्कजवळ २८ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास पोलीस गस्त घालत होते. यावेळी एका दुचाकीवरून तीन संशयित येताना दिसले. पोलिसांनी त्यांना थांबवण्याचा इशारा केला असता, आरोपींनी पोलिसांना पाहून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले. पोलिसांनी संशयितांची झडती घेतली असता, त्यांच्याकडे विना परवाना बाळगलेले दोन गावठी बनावटीचे कट्टे (पिस्तूल) आणि दोन जिवंत काडतुसे सापडली. याशिवाय त्यांच्याकडून १ लाख रुपयांची पल्सर दुचाकी क्रमांक (एमएच २० डीआर २७७६) आणि एक मोबाईल फोन जप्त करण्यात आला आहे.

याप्रकरणी संशयित आरोपी दिपक ठकुबा गुंजाळ (वय २८, रा. सिल्लोड), विठ्ठल रंगनाथ सोनवणे (वय-२५, रा. सिल्लोड) आणि अजय विरजू गांगुर्डे (रा. जळगाव) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.



