चाळीसगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चाळीसगाव तालुक्यातील चिचगव्हाण गावातून बेपत्ता झालेले प्रौढ व्यक्तीचा मृतदेह शेतातील विहिरीत मिळून आल्याने खळबळ उडाल्याची घटना शनीवारी २८ मार्च रोजी पहाटे ५ वाजेच्या सुमारास समोर आले आहे. याबाबत मेहुणबारे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्रविणकुमार जालिंदर निकम वय ४२ रा. चिचगव्हाण ता. चाळीसगाव असे मयत झालेल्या प्रौढाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, चाळीसगाव तालुक्यातील चिचगव्हाण येथे प्रविणकुमार निकम हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला होते. दरम्यान २७ मार्च रोजी रात्री १० वाजेपासून घरात कुणाला काहीही न सांगता ते बेपत्ता झाले होते. त्यावेळी त्यांच्या नातेवाईकांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला परंतू कोणतीही माहिती मिळाली नाही. दुसऱ्या दिवशी शनीवारी २८ मार्च रोजी सकाळी ५ वाजेच्या सुमारास गावात राहणारे मांगीलाल वाघ यांच्या शेतातील विहिरीत त्यांचा मृतदेह तरंगतांना मिळून आला. यावेळी मेहुणबारे पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. काही तरूणांच्या मदतीने त्याला बाहेर काढण्यात आले. याबाबत मेहुणबारे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोहेकॉ विजय खैरे हे करीत आहे.




