Home Cities अमळनेर ज्येष्ठ पत्रकार योगेश महाजन यांचे हृदयविकाराने निधन

ज्येष्ठ पत्रकार योगेश महाजन यांचे हृदयविकाराने निधन


अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । अमळनेरच्या पत्रकारितेच्या क्षेत्रातील एक अभ्यासू, धडाडीचे आणि निर्भीड व्यक्तिमत्त्व हरपल्याने शहरावर शोककळा पसरली आहे. ज्येष्ठ पत्रकार योगेश अशोकराव महाजन यांचे शनिवार, २८ मार्च रोजी पहाटेच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते ४७ वर्षांचे होते.

त्रिकोणी बगीच्याजवळील वाघ बिल्डिंग येथे वास्तव्यास असलेले योगेश महाजन यांनी आपल्या पत्रकारितेच्या प्रवासात वेगळी छाप उमटवली होती. त्यांनी दै. ‘सकाळ’मध्ये उपसंपादक म्हणून काम पाहिले होते, तर सध्या ते दै. ‘ग्लोबल महातेज’मध्ये मुख्य उपसंपादक म्हणून कार्यरत होते. त्यांच्या अकाली निधनामुळे पत्रकारिता क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

सन २००२ पासून पत्रकारितेत सक्रिय असलेल्या महाजन यांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून समाजातील विविध प्रश्नांना वाचा फोडली. त्यांची शैली मितभाषी असली तरी आशयघन आणि प्रभावी होती. त्यांनी केवळ बातम्या देण्यापुरते काम मर्यादित न ठेवता समाजमनाला विचार करायला लावणारे लेखन केले. त्यांच्या बातम्यांमध्ये सत्याचा शोध, सामान्यांच्या भावना आणि सामाजिक बांधिलकी स्पष्टपणे दिसून येत असे.

कोणत्याही विषयाचा सखोल अभ्यास करून ठाम भूमिका मांडणे ही त्यांची खासियत होती. त्यांनी अनेकदा संवेदनशील विषय हाताळताना निर्भीडपणे आपले मत मांडले आणि सत्याच्या बाजूने ठामपणे उभे राहिले. त्यामुळे ते पत्रकारितेतील नवोदितांसाठी प्रेरणास्थान ठरले होते.

त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, आई, वडील आणि भाऊ असा परिवार आहे. त्यांच्या निधनाची बातमी समजताच अमळनेर शहरासह परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली. समाजातील विविध क्षेत्रांतील मान्यवर, राजकीय पदाधिकारी, पत्रकार बांधव आणि नागरिकांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

सायंकाळी ६ वाजता चोपडा रस्त्यावरील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी अत्यंत शोकाकुल वातावरणात मोठ्या संख्येने उपस्थितांनी त्यांना अखेरचा निरोप दिला. दै. ‘ग्लोबल महातेज’ परिवार, मंगळग्रह सेवा संस्था तसेच ‘व्हॉईस ऑफ मीडिया’तर्फेही त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.


Protected Content

Play sound