मुंबई-वृत्तसेवा । आयपीएल 2026 हंगामाच्या सुरुवातीपूर्वीच चेन्नई सुपर किंग्स संघाला मोठा धक्का बसला असून, संघाचा कणा मानला जाणारा अनुभवी खेळाडू एम. एस. धोनी सुरुवातीच्या सामन्यांतून बाहेर राहणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे संघाच्या प्लेइंग-11 मध्ये मोठे बदल होण्याची शक्यता निर्माण झाली असून, चाहत्यांमध्ये उत्सुकता आणि चिंता दोन्ही वाढल्या आहेत.
चेन्नई सुपर किंग्सचा आयपीएल 2026 मधील प्रवास 30 मार्चपासून सुरू होणार आहे. पहिल्याच सामन्यात राजस्थान रॉयल्सविरुद्ध सामना रंगणार असताना, धोनीच्या अनुपस्थितीमुळे संघाच्या रणनीतीवर परिणाम होणार आहे. पोटरीच्या स्नायूला झालेल्या दुखापतीमुळे धोनी सध्या पुनर्वसन प्रक्रियेत आहे आणि किमान दोन ते तीन सामने तो खेळू शकणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

धोनीच्या अनुपस्थितीत यष्टिरक्षणाची जबाबदारी कोण सांभाळणार, हा मोठा प्रश्न होता. मात्र, आता संजू सॅमसन हा पर्याय जवळपास निश्चित मानला जात आहे. सराव सत्रातील व्हिडिओमध्ये सॅमसन यष्टिरक्षण करताना दिसल्याने त्याच्या निवडीवर शिक्कामोर्तब झाल्याचे मानले जात आहे. तसेच तो सलामीवीर म्हणूनही संघासाठी खेळणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.
कर्णधार ऋतुराज गायकवाड आणि संजू सॅमसन ही जोडी डावाची सुरुवात करेल. दोघांकडूनही आक्रमक सुरुवात होण्याची अपेक्षा आहे. सॅमसनचा अनुभव आणि फॉर्म लक्षात घेता, चेन्नईसाठी तो महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. तिसऱ्या क्रमांकावर उर्विल पटेलला संधी मिळण्याची शक्यता आहे, तर चौथ्या स्थानावर दक्षिण आफ्रिकेचा युवा फलंदाज डेवाल्ड ब्रेविस मैदानात उतरणार आहे.
पाचव्या क्रमांकावर शिवम दुबेची जागा जवळपास निश्चित आहे. सहाव्या क्रमांकासाठी सरफराज खान आणि आयुष म्हात्रे यांच्यात स्पर्धा पाहायला मिळू शकते. दोघांपैकी कोणाला संधी मिळते, हे संघ व्यवस्थापनाच्या अंतिम निर्णयावर अवलंबून असेल. सातव्या क्रमांकासाठी प्रशांत वीर आणि कार्तिक शर्मा हे पर्याय उपलब्ध असून, या दोघांपैकी एकाची निवड होण्याची शक्यता आहे.
गोलंदाजी विभागात अकील हुसेन आणि नूर अहमद हे फिरकी गोलंदाज म्हणून महत्त्वाची भूमिका निभावतील. तर वेगवान गोलंदाजीची जबाबदारी मॅट हेन्री आणि खलील अहमद यांच्या खांद्यावर असणार आहे. या संतुलित संघरचनेत धोनीची उणीव निश्चितच जाणवेल, मात्र युवा खेळाडूंना स्वतःला सिद्ध करण्याची मोठी संधी मिळणार आहे.



