जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । वाचन संस्कृतीला चालना देत समाजात ज्ञानाचा प्रसार व्हावा या उद्देशाने पिंप्राळा परिसरात ‘महाराणा प्रताप सार्वजनिक मुक्त वाचनालय व पुस्तकालया’ची स्थापना करण्यात आली असून, या वाचनालयाचे उद्घाटन आज उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. नव्या वाचनालयामुळे परिसरातील विद्यार्थ्यांना आणि वाचनप्रेमींना एक सुसज्ज अभ्यासाचे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे.
जळगाव महानगरपालिकेचे प्रभाग क्रमांक ८ चे नगरसेवक इंजिनिअर नरेंद्र आत्माराम पाटील यांच्या हस्ते फीत कापून वाचनालयाचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी बोलताना त्यांनी वाचनाचे महत्त्व अधोरेखित करत सांगितले की, आजच्या डिजिटल युगात तरुणांनी पुस्तकांशी नाळ जोडणे अत्यंत आवश्यक आहे. हे मुक्त वाचनालय पिंप्राळा परिसरातील विद्यार्थ्यांसाठी ज्ञानाची गंगा ठरेल आणि त्यांच्या बौद्धिक विकासाला दिशा देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बुलंद छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी या उपक्रमाचे कौतुक करत सामाजिक जडणघडणीत ग्रंथालयांची भूमिका महत्त्वाची असल्याचे सांगितले. वाचनालयांमुळे समाजात सकारात्मक बदल घडतो आणि तरुण पिढीला योग्य दिशा मिळते, असे त्यांनी नमूद केले.
या वाचनालयाची संकल्पना आणि स्थापना संस्थापक अध्यक्ष मिथुन ढिवरे यांनी केली आहे. परिसरातील नागरिकांना, विशेषतः स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी योग्य वातावरण आणि आवश्यक पुस्तके सहज उपलब्ध व्हावीत, या हेतूने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. वाचनालयात विविध विषयांवरील पुस्तके, अभ्यास साहित्य आणि शांत अभ्यासाची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.
उद्घाटन सोहळ्यावेळी परिसरातील नागरिक, विद्यार्थी, तरुण वर्ग आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. नव्याने सुरू झालेल्या या वाचनालयामुळे पिंप्राळा परिसरात आनंदाचे वातावरण असून, भविष्यात हे केंद्र ज्ञानवृद्धीचे महत्त्वाचे ठिकाण ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.



