जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । येथील गोडावरी फाउंडेशनच्या गोदावरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड पॉलिटेक्निकतर्फे “फिनिक्स 2K26” या राष्ट्रीय स्तरावरील तांत्रिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. २८ मार्च रोजी सकाळी १० वाजता या भव्य कार्यक्रमाची सुरुवात होणार असून, विद्यार्थ्यांसाठी नवकल्पना आणि तांत्रिक कौशल्य प्रदर्शित करण्यासाठी हा एक मोठा मंच ठरणार आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटन जळगावचे अतिरिक्त जिल्हाधिकारी डॉ. श्रीमंत हरकर यांच्या हस्ते होणार आहे. तसेच बिटस्काय इंडियाचे सहसंस्थापक हर्षल पाटील आणि एमएसईडीसीएलचे अधीक्षक अभियंता विनोद सी. पाटील हे प्रमुख उपस्थित राहणार आहेत.

कार्यक्रमात गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील, सदस्य डॉ. केतकी पाटील, डॉ. वैभव पाटील आणि डॉ. अनिकेत पाटील हे मान्यवर ‘गेस्ट ऑफ ऑनर’ म्हणून उपस्थित राहणार आहेत.
फिनिक्स 2K26 या महोत्सवामध्ये विविध तांत्रिक स्पर्धा, प्रकल्प प्रदर्शन, इनोव्हेशन सत्रे आणि विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. देशभरातील विद्यार्थ्यांना आपली कौशल्ये सादर करण्याची संधी मिळणार असल्याने या कार्यक्रमाकडे विशेष लक्ष लागले आहे.
गोदावरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या प्राचार्य व स्टाफतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, विद्यार्थ्यांसह तंत्रज्ञान क्षेत्रातील रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.



