जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शहरातील महिला सक्षमीकरण आणि सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या आदर्श महिला मंडळाचा पदग्रहण समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. २४ मार्च २०२६ रोजी महेश प्रगती मंडळ, जळगाव येथे आयोजित या सोहळ्यात नवीन कार्यकारिणीचा शपथविधी मोठ्या जल्लोषात झाला.
या कार्यक्रमात अश्विनी मुंदडा यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. सामाजिक कार्यात सक्रिय असलेल्या केदारनाथ मुंदडा यांच्या परिवारातील सदस्य असल्यामुळे त्यांच्या नेतृत्वाकडून मंडळाच्या कार्याला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. त्यांच्या निवडीने उपस्थितांमध्ये समाधान आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

समारंभास मंडळाच्या संस्थापिका शीतलजी मंत्री, प्रमुख अतिथी केदारनाथजी मुंदडा तसेच शहरातील विविध महिला मंडळांच्या अध्यक्षा व सचिव यांची विशेष उपस्थिती लाभली. सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत नवीन कार्यकारिणीने शपथ घेत आपल्या जबाबदाऱ्या स्वीकारल्या.
नवीन कार्यकारिणीत अध्यक्ष अश्विनी मुंदडा यांच्यासह सचिवपदी सोनाली काबरा, उपाध्यक्षपदी सुनंदा लाठी, कोषाध्यक्षपदी मनीषा मणियार, पीआरओपदी लीना काबरा तर सल्लागारपदी आरती काबरा यांची निवड करण्यात आली. याशिवाय नेहा लाठी, सारिका कोगटा, पूनम मंत्री, मधु तापडिया, राणी लाहोटी, वैशाली मुंदडा, विमला करनानी, शर्मिला न्याती, सपना काबरा, नम्रता काबरा, सुलभा छापरवाल, स्मिता सोमाणी, दीप्ती झंवर आणि नीलिमा धुप्पड यांची कार्यकारिणी सदस्य म्हणून निवड झाली.
कार्यक्रमात मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन कल्पना काबरा आणि सुचिता सोनी यांनी केले, तर आभार प्रदर्शन पूनम मंत्री यांनी मानले. “मोर” या आकर्षक थीमवर आधारित सजावट हा कार्यक्रमाचा विशेष आकर्षण ठरला. स्वागत गीतावर भक्ती मुंदडा यांनी सादर केलेल्या नृत्यामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत प्राप्त झाली.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवरांनी नवीन कार्यकारिणीला शुभेच्छा देत आगामी कार्यकाळात महिला सक्षमीकरणासाठी प्रभावी कार्य होईल, असा विश्वास व्यक्त केला. समारोपानंतर सर्वांनी स्नेहभोजनाचा आनंद घेतला.



