यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम यांच्या जन्मोत्सवानिमित्त यावल शहरात विविध ठिकाणी विधीवत पूजा-अर्चना करत हा सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. सकाळपासूनच शहरात धार्मिक कार्यक्रमांची लगबग पाहायला मिळाली, तर पालखी मिरवणुकीने उत्सवाची रंगत अधिकच वाढवली.
यावल शहरातील रेणुका देवी मंदिरातून श्रीराम जन्मोत्सवाच्या प्रमुख कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. मान्यवरांच्या उपस्थितीत प्रभू श्रीरामांच्या पालखीची विधीवत पूजा करून मिरवणुकीचा शुभारंभ झाला. या प्रसंगी रावेर-यावल मतदारसंघाचे आमदार अमोल हरिभाऊ जावळे, नगराध्यक्ष छायाताई पाटील, माजी नगराध्यक्ष अतुल वसंत पाटील यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. आमदार अमोल जावळे यांनी उपस्थितांना श्रीराम जन्मोत्सवाच्या शुभेच्छा देत समाजात एकात्मता आणि सद्भावना टिकवण्याचे आवाहन केले.

या कार्यक्रमाला नगरसेवक उमेश फेगडे, शिवसेना गटनेते सागर चौधरी, भाजप गटनेत्या नंदाताई महाजन, निलेश बारी, धनंजय कोळी, राहुल कोळी, प्राची पाठक, हर्षवर्धन भोईटे यांच्यासह उत्सव समितीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. शहरातील श्रीराम भक्तांनीही मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवला.
रेणुका देवी मंदिरातून निघालेली पालखी मिरवणूक शहराच्या प्रमुख मार्गांवरून पार पडली. ढोल-ताशे आणि झांजच्या गजरात वातावरण दुमदुमून गेले होते. विद्यार्थी आणि विद्यार्थिनींच्या लेझीम पथकांनी सादर केलेल्या नृत्याने मिरवणुकीत विशेष आकर्षण निर्माण केले. पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेल्या नागरिकांनी उत्सवाची शोभा वाढवली.
दरम्यान, शहरातील विविध मंदिरांमध्येही श्रीराम जन्मोत्सवानिमित्त पूजा-अर्चना करण्यात आली. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता, त्यामुळे सर्व कार्यक्रम शांततेत पार पडले.



