Home Cities जळगाव राष्ट्रीय गायन स्पर्धेत भावेश जाधवचे यश ; डॉ. उल्हास पाटील कॉलेजमध्ये आनंदोत्सव

राष्ट्रीय गायन स्पर्धेत भावेश जाधवचे यश ; डॉ. उल्हास पाटील कॉलेजमध्ये आनंदोत्सव


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।  येथील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याने राष्ट्रीय स्तरावर गायन स्पर्धेत अव्वल क्रमांक पटकावत महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल केले आहे. द्वितीय वर्षाचा विद्यार्थी भावेश जाधव याच्या या यशामुळे महाविद्यालयात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून सर्वत्र त्याचे कौतुक होत आहे.

शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित राष्ट्रीय स्तरावरील ‘कलासंगम’ स्नेहसंमेलनात गायन-वादन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत राज्यातील एकूण ३१ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत भावेश जाधव याने १९६८ साली प्रदर्शित झालेल्या ‘इज्जत’ चित्रपटातील गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी गायलेले ‘ये दिल तुम बिन’ हे गाणे सादर करत परीक्षकांची मने जिंकली आणि प्रथम क्रमांक पटकावला.

त्याच्या या उल्लेखनीय यशाबद्दल त्याला ट्रॉफी तसेच रोख ५००० रुपयांचे पारितोषिक प्रदान करण्यात आले. भावेशच्या सुरेल आवाजाने आणि सादरीकरणातील भावपूर्णतेने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. त्याच्या या कामगिरीमुळे डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचा लौकिक उंचावला आहे.

या यशानंतर महाविद्यालयात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. अधिष्ठाता डॉ. प्रशांत सोळंके यांनी भावेश जाधवचे विशेष अभिनंदन करत त्याच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील, सदस्या डॉ. केतकी पाटील, प्रख्यात हृदयरोग तज्ज्ञ डॉ. वैभव पाटील यांनीही त्याच्या यशाबद्दल आनंद व्यक्त करत कौतुक केले.

भावेश जाधवच्या या यशामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रेरणादायी वातावरण निर्माण झाले असून शैक्षणिक क्षेत्राबरोबरच सांस्कृतिक क्षेत्रातही प्रगती साधता येते, हे त्याने सिद्ध करून दाखवले आहे.

 


Protected Content

Play sound