Home Cities धरणगाव धरणगावातील श्री बालाजी मंदिरात रामनवमी उत्साहात साजरी

धरणगावातील श्री बालाजी मंदिरात रामनवमी उत्साहात साजरी


धरणगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । येथील श्री बालाजी मंदिरात रामनवमीचा पवित्र उत्सव यंदाही मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा करण्यात आला. धार्मिक वातावरण, भजन-कीर्तन आणि महाआरतीच्या कार्यक्रमांनी मंदिर परिसर राममय झाला होता.

आज गुरुवार २६ मार्च आयोजित या उत्सवात सकाळपासूनच भाविकांची मंदिरात गर्दी उसळली होती. मंदिराचे पुरोहित गणेश पुराणिक यांनी श्रीराम जन्माची पौराणिक कथा अत्यंत ओघवत्या शैलीत सांगत उपस्थित भाविकांना मंत्रमुग्ध केले. त्यांच्या कथनामुळे श्रीराम जन्मोत्सवाचे धार्मिक महत्त्व अधिक अधोरेखित झाले. दुपारी बरोबर बारा वाजता श्रीराम जन्माचा सोहळा पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. यावेळी मंदिरात ‘जय श्रीराम’च्या घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले. त्यानंतर महाआरती संपन्न झाली आणि उपस्थित भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले.

महाआरतीनंतर जीवन बयस आणि त्यांच्या भजनी मंडळाने सादर केलेल्या भजनांच्या कार्यक्रमाने वातावरण अधिक भक्तिमय झाले. भजनांच्या सुरेल सादरीकरणाने उपस्थित भाविकांना आध्यात्मिक आनंदाचा अनुभव दिला. या कार्यक्रमाला श्री बालाजी वाहन व्यवस्थापक मंडळाचे अध्यक्ष डी. आर. पाटील, जीर्णोद्धार प्रमुख जीवनसिंह बयस, खजिनदार किरण वाणी, विश्वस्त चंद्रकांत अमृतकर, पंडित चौधरी, महेंद्र बयस, बाळकृष्ण येवले, विश्वास बयस, कालिदास पुराणिक, गणेश राजपूत, शाम भाटिया यांच्यासह परिसरातील अनेक भाविक बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 


Protected Content

Play sound