मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर शहरात काही दिवसांपूर्वी मोठ्या धडाक्यात सुरू झालेल्या गुटखा बंदी मोहिमेचा आता पूर्णपणे फज्जा उडाल्याचे वास्तव समोर आले आहे. सुरुवातीला कडक कारवाईचा डंका पिटणाऱ्या पोलीस प्रशासनाची भूमिका आता संशयाच्या भोवऱ्यात सापडली असून, शहरात पुन्हा एकदा खुलेआम गुटखा विक्री आणि वाहतूक सुरू झाल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
पोलीस प्रशासनाने काही दिवसांपूर्वी विमल गुटखा व तत्सम तंबाखूजन्य पदार्थांवर कडक निर्बंध लावत कारवाईची मालिका सुरू केली होती. गुटखा वाहतूक करणाऱ्या वाहनांवर छापे, दंडात्मक कारवाई आणि कठोर इशारे यामुळे शहरात काही प्रमाणात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, ही भीती फार काळ टिकली नाही. अवघ्या आठवड्याभरातच कारवाईचा जोर ओसरल्याचे दिसून आले आणि गुटखा वाहतूक पुन्हा पूर्ववत सुरू झाली.

सध्या शहरातील विविध भागांत गुटखा वाहतूक करणारी वाहने उघडपणे फिरताना दिसत आहेत. त्यामुळे पोलीस प्रशासनाने या प्रकाराकडे जाणीवपूर्वक डोळेझाक केल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. “कारवाई अचानक थांबली कशी?” हा प्रश्न सर्वसामान्यांपासून व्यापाऱ्यांपर्यंत सर्वांच्या चर्चेचा विषय ठरत आहे.
या पार्श्वभूमीवर काही नागरिकांनी गंभीर आरोपही केले आहेत. “सर्व काही ठरवूनच चालू आहे का?” असा सवाल उपस्थित करत काही ठिकाणी ‘हप्तेवाढ’ झाल्यामुळेच कारवाई शिथिल झाली का, असा संशय व्यक्त केला जात आहे. या चर्चांमुळे पोलीस प्रशासनाची प्रतिमा डागाळली जात असून, पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित होत आहेत.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी पोलिसांनी एका मोठ्या व्यापाऱ्यावर छापा टाकल्याचा गाजावाजा केला होता. मात्र, त्या ठिकाणी कोणताही मुद्देमाल सापडला नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे ही कारवाई केवळ दिखावा होती का, असा प्रश्नही उपस्थित होत आहे. या घटनेमुळे पोलीस कारवाईच्या प्रामाणिकतेबाबत शंका अधिकच वाढल्या आहेत.
शहरात खुलेआम सुरू असलेल्या गुटखा विक्री आणि वाहतुकीकडे पोलीस प्रशासन दुर्लक्ष करत असल्याची भावना नागरिकांमध्ये बळावत आहे. गुटखा बंदीची प्रभावी अंमलबजावणी करण्यात प्रशासन अपयशी ठरत असल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे. त्यामुळे कायद्याचा धाक उरला आहे का, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.
नागरिकांनी या प्रकरणी तात्काळ कठोर भूमिका घेऊन पारदर्शक चौकशी करण्याची मागणी केली आहे. मात्र, संबंधित अधिकाऱ्यांकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया न आल्याने संशय अधिकच गडद होत चालला आहे. परिणामी, पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवरचे प्रश्नचिन्ह कायम राहिले असून, परिस्थिती लवकर सुधारेल का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



