Home राजकीय मंत्री नरहरी झिरवळ गोत्यात : ट्रान्सजेंडरसोबतचा आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल !

मंत्री नरहरी झिरवळ गोत्यात : ट्रान्सजेंडरसोबतचा आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल !


मुंबई- लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. राज्याचे मंत्री नरहरी झिरवळ यांचा एका ट्रान्सवुमनसोबतचा कथित आक्षेपार्ह व्हिडिओ समोर आल्याचा दावा करण्यात येत असून, यामागे मोठ्या ‘हनीट्रॅप’ आणि ब्लॅकमेलिंग रॅकेटचा संशय व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणाचा खुलासा संबंधित ट्रान्सवुमनच्या सख्ख्या भावानेच केल्याचा दावा आहे.

मंत्री नरहरी झिरवळ यांचा आक्षेपार्ह व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला असून याच्याच आधारे लोकशाही मराठी या वृत्तवाहिनीने मोठा गौप्यस्फोट केला आहे. या वृत्तानुसार झिरवळ हे पवन यादव या ट्रान्सजेंडर व्यक्तीसोबत आक्षेपार्ह स्थितीत दिसत असून त्याचाच भाऊ रवी यादव याने हे प्रकरण चव्हाट्यावर आणत पोलीसात धाव घेतल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

या कथित व्हिडिओचे चित्रीकरण शासकीय निवासस्थानी झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. सार्वजनिक कामांसाठी असलेल्या सरकारी जागेचा अशा प्रकारे गैरवापर झाल्याने नेत्यांच्या नैतिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. रवी यादवच्या म्हणण्यानुसार, पवन यादवला ‘ट्रान्सजेंडर बोर्ड’मध्ये पद हवे होते. त्यासाठी मंत्रालय परिसरात मंत्र्यांशी जवळीक साधण्यात आली. पुढे ब्लॅकमेलिंगसाठीच हे संबंध जाणीवपूर्वक प्रस्थापित करण्यात आल्याचा आरोप आहे.

संबंध प्रस्थापित झाल्यानंतर पवन यादवने मंत्र्यांवर लग्नासाठी दबाव टाकल्याचा आरोप आहे. मागणी मान्य न केल्यास ‘लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार’ केल्याचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याचा दावा करण्यात आला आहे. रवी यादवच्या म्हणण्यानुसार, पवन यादववर यापूर्वी खंडणीसंबंधी गुन्हा दाखल आहे. तसेच स्वतःच्या भावालाही खोट्या प्रकरणात अडकवून पोलिसांकडून दबाव आणल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

या प्रकरणात केवळ नरहरी झिरवळच नव्हे, तर इतर काही आमदार आणि खासदारही संपर्कात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे या कथित ‘हनीट्रॅप’ रॅकेटची व्याप्ती मोठी असण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

रवी यादवने पवनविरोधात तक्रार दिली असली तरी अद्याप एफआयआर दाखल झालेला नाही. पवनचे काही प्रभावशाली राजकीय नेत्यांशी संबंध असल्याने पोलिसांवर दबाव टाकला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. अलीकडेच नाशिक येथील अशोक खरात या कथित भोंदू बाबाच्या कृत्यांमुळे खळबळ उडालेली असतांनाच आता मंत्री नरहरी झिरवळ यांचा हा कथित व्हिडीओ समोर आल्याने चर्चेला उधाण आले आहे. यातून आता झिरवळ हे गोत्यात आल्याचे देखील दिसून येत आहे.


Protected Content

Play sound