धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील पाताल नगरी परिसरातील अहमद रजा चौकात अज्ञात चोरट्यांनी बंद घर फोडत सोने-चांदीचे दागिणे व एक लाखाची रोकड असा एकूण साधारण ४ लाखाचा ऐवज लंपास केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. दरम्यान, शहरातील मध्यभागी तसेच भरवस्तीत चोरी झाल्यामुळे रहिवाशांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरलेले आहे.
या संदर्भात सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, पाताल नगरी परिसरातील अहमद रजा चौकात सेवानिवृत्त मुख्याध्यापक मोहम्मद कासीम शेख अहमद हे आपल्या परिवारासह राहतात. त्यांचा एक मुलगा रेल्वेत तर दुसरा शिक्षक आहे. मोहम्मद कासीम हे मागील ४ ते ५ दिवसापासून परिवारासह बाहेर गावी गेलेले होते. त्यांच्या मुलाचे मागील महिन्यातच लग्न झालेले असल्यामुळे सुनेचे दागिने व रोकड कपाटात ठेवलेली होती. आज सकाळी ८ वाजेच्या सुमारास त्यांच्या घराजवळ लावलेली गाडी घेण्यासाठी त्यांचा भाचा गेला असता,त्याला दरवाजाचे कुलूप तुटलेल्या अवस्थेत दिसले. त्याने तात्काळ मोहम्मद कासीम यांना फोन लावला. त्यानंतर घटनेची माहिती पोलीसांना देण्यात आली. पोलिसांनी पंचनामा केला आहे. दरम्यान, यासंदर्भात प्रतिनिधीने मोहम्मद कासीम यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, सुनेचे ४ ते ५ तोळे सोने व एक लाखाची रोकड घरात होती. परंतू घरमालक मोहम्मद कासीम हे बाहेरगावी असल्यामुळे गुन्हा दाखल झालेला नव्हता. त्यामुळे चोरीची नेमका आकडा समोर आलेला नाही.
सीसीटीव्ही कॅमेरे बंद
पाताल नगरी परिसरातील अहमद रजा चौकात मोठे हायमास्ट लाईट आहेत. एवढेच नव्हे तर, दोन सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. परंतू मागील काही दिवसापासून कॅमेरे बंद असल्याची संधी साधत चोरट्यांनी धाडसी चोरी केली आहे. विशेष म्हणजे शहरातील मध्यभागी तसेच भरवस्तीत चोरी झाल्यामुळे रहिवाशांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरलेले आहे. दरम्यान, बंद सीसीटीव्ही कॅमेरे सुरु करण्यात यावेत व पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी होत आहे.