जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । समाजाचा चौथा आधारस्तंभ मानल्या जाणाऱ्या पत्रकारांच्या कल्याण व मनोरंजनासाठी एक अनोखा उपक्रम म्हणून ‘पत्रकार प्रीमियर लीग पर्व २’ चे आयोजन करण्यात आले असून दि. २६ ते २९ मार्च दरम्यान सागर पार्क मैदानावर हा चारदिवसीय क्रिकेट महोत्सव रंगणार आहे.
पत्रकार हे नेहमीच जीवाची बाजी लावत ऊन, वारा, पाऊस आणि थंडी सहन करत दिवसरात्र काम करत असतात. गेल्या वर्षभरात दोन मोठ्या निवडणुकांसह विविध सणोत्सवांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी अविरत सेवा बजावली आहे. विविध संस्था आणि संघटनांकडून अनेक स्पर्धांचे आयोजन होत असताना पत्रकारांच्या विश्रांती व मनोरंजनाचा विचार फारसा होत नाही. हीच बाब लक्षात घेऊन पत्रकारांच्या एकत्रीकरणासाठी आणि त्यांच्या कल्याणासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

दि. २६, २७, २८ आणि २९ मार्च रोजी सागर पार्क मैदानावर होणाऱ्या या स्पर्धेत जिल्हाभरातील पत्रकारांचा सहभाग राहणार आहे. प्रत्येक तालुक्यातील पत्रकारांचा स्वतंत्र संघ तयार करण्यात आला असून या माध्यमातून पत्रकारांमध्ये सुसंवाद, मैत्रीभाव आणि खेळाडू वृत्ती वाढीस लागेल, असा आयोजकांचा विश्वास आहे.
या स्पर्धेत जिल्ह्यातील १४ संघ, जळगाव शहरातील ५ संघ, संपादकांचा संघ, तसेच लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, डॉक्टर, वकील आणि पोलीस प्रशासनाचे संघ अशा एकूण २६ संघांचा सहभाग असणार आहे. तीन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत सहभागी खेळाडूंंकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नसून सर्वांसाठी चहा व जेवणाची व्यवस्था आयोजकांकडून केली जाणार आहे. समारोप सोहळ्यात विजेत्या संघांना हजारो रुपयांची आकर्षक बक्षिसे देण्यात येणार असून स्पर्धा दर्जेदार करण्याचा आयोजकांचा प्रयत्न आहे.
गेल्या वर्षी आयोजित स्पर्धेला पत्रकार व विविध मान्यवरांकडून मोठा प्रतिसाद मिळाला होता. यंदाही विविध पत्रकार संघटना या उपक्रमात सहभागी झाल्या असून आयोजकांनी सर्वांचे सहकार्य आणि मार्गदर्शन अपेक्षित केले आहे. अनुभवी व्यक्तींच्या सूचनांमुळे स्पर्धेचे दुसरे पर्व अधिक यशस्वी होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. तसेच सर्वांनी कुटुंबासह या चार दिवसांत स्पर्धेला भेट देण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.



