भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ तालुक्यातील साकरी गावात ‘तू कार घेऊन गावात का आला?’ या क्षुल्लक कारणावरून एका तरुणाला लाकडी दांडके आणि फावड्यांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी भुसावळ तालुका पोलीस स्टेशनमध्ये एकूण ८ जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ तालुक्यातील साकरी गावातील किन्ही रोडवरील खोकली माता मंदिराजवळ ही घटना सोमवारी २३ मार्च रोजी सकाळी साडे नऊ ते दहा वाजेच्या सुमारास घडली. गावात राहणारे सुनील सुरेश तायडे यांचा मुलगा कार घेऊन गावात आला होता. ‘तू कार घेऊन गावात का आला?’ असा जाब विचारत आरोपींनी बेकायदेशीर मंडळी जमवून वाद घालण्यास सुरुवात केली. संशयित आरोपी प्रवीण जयराम बाविस्कर, दिनेश जयराम बाविस्कर, मोहन जयराम बाविस्कर, विकास कौतिक काकडे, सागर प्रभाकर सोनवणे, संजु आत्माराम तोंडे, माधुरी प्रवीण बाविस्कर आणि सुरेखा मोहन बाविस्कर (सर्व रा. साकरी, ता. भुसावळ) यांनी संगनमत करून हातात असलेल्या लाकडी दांडा आणि फावड्यांनी फिर्यादीच्या मुलावर हल्ला चढवला. त्याला लाथाबुक्क्यांनी पाठीवर, हातापायावर आणि डोक्यावर गंभीर मारहाण करण्यात आली. इतक्यावरच न थांबता, “तुला विहिरीत फेकून देऊन जीवे ठार मारू,” अशी उघड धमकी दिली.

सुनील तायडे यांनी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात धाव घेवून फिर्याद दिली. त्यानुसार पोलीस ठाण्यात संशयित आरोपी प्रवीण जयराम बाविस्कर, दिनेश जयराम बाविस्कर, मोहन जयराम बाविस्कर, विकास कौतिक काकडे, सागर प्रभाकर सोनवणे, संजु आत्माराम तोंडे, माधुरी प्रवीण बाविस्कर आणि सुरेखा मोहन बाविस्कर (सर्व रा. साकरी, ता. भुसावळ) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



