जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जन्मजात हृदयरोगाने ग्रस्त बालकांना वेळेवर निदान आणि उपचार मिळावेत या उद्देशाने जळगाव येथील डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात २७ ते २९ मार्चदरम्यान लहान बालकांच्या हृदयाची विशेष मोफत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
जन्मत:च हृदयाला छिद्र असणे किंवा इतर जन्मजात हृदयविकारामुळे अनेक बालकांना लहान वयातच गंभीर आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागते. अनेक वेळा या आजारांची लक्षणे सुरुवातीला स्पष्ट दिसत नाहीत. बालकाला श्वास घेण्यास त्रास होणे, वजन नीट न वाढणे किंवा लवकर थकवा येणे अशी लक्षणे आढळू शकतात. अशा परिस्थितीत वेळेवर तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी होणे अत्यंत महत्त्वाचे ठरते.

या शिबिरात अनुभवी व तज्ज्ञ हृदयतज्ज्ञ डॉक्टरांची टीम बालकांची सखोल तपासणी करणार आहे. आधुनिक यंत्रणांच्या साहाय्याने आवश्यक त्या सर्व तपासण्या करून प्रत्येक बालकाच्या आरोग्याची स्थिती तपासली जाणार आहे. तपासणीनंतर आवश्यकतेनुसार पुढील उपचारांची दिशा निश्चित करण्यात येणार आहे.
शिबिरात तपासणी झाल्यानंतर ज्या बालकांना शस्त्रक्रियेची आवश्यकता भासेल, अशा गरजू बालकांवर शासनाच्या विविध योजनांअंतर्गत मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे.
अनुभवी डॉ. वैभव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. धवलकुमार खडके, अपोलो रूग्णालयाचे डॉ. भूषण चव्हाण, डॉ. सिद्धेश्वर खांडे, डॉ. झिशान आणि डॉ. मनमिता रेड्डी यांची तज्ज्ञ टीम शस्त्रक्रिया पार पाडणार आहे. या शस्त्रक्रिया महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत मोफत केल्या जाणार आहेत.
या विशेष शिबिरानंतरही बालकांच्या हृदय तपासणीची सुविधा नियमितपणे उपलब्ध राहणार आहे. दर आठवड्याच्या सोमवार आणि बुधवार या दिवशी रुग्णालयात बालकांची तपासणी केली जाणार आहे, ज्यामुळे पालकांना सातत्याने मार्गदर्शन मिळणार आहे.
जन्मजात हृदयविकार असलेल्या बालकांना वेळेवर उपचार मिळाल्यास त्यांचे आयुष्य निरोगी आणि सामान्य होऊ शकते. त्यामुळे ज्या पालकांना आपल्या बालकांमध्ये अशा लक्षणांचा संशय आहे, त्यांनी या मोफत तपासणी शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन रुग्णालयातर्फे करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी व नोंदणीसाठी ९४०३३३७४९४ आणि ७०३०५७११११ या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.



