जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलच्या बहुप्रतिक्षित निवडणुकीला अखेर सुरुवात झाली असून, तब्बल साडेआठ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर मतदान प्रक्रिया पार पडत असल्याने वकिलांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
या निवडणुकीत एकूण २३ जागांसाठी १५५ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. संपूर्ण महाराष्ट्र आणि गोवा कार्यक्षेत्रातील वकिलांसाठी ही निवडणूक महत्त्वाची मानली जात असून, सकाळपासूनच मतदान केंद्रांवर वकिलांच्या रांगा लागल्याचे चित्र दिसून आले. मतदानाची वेळ सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत ठेवण्यात आली आहे.

जळगाव जिल्ह्यातून या निवडणुकीत चार प्रमुख उमेदवार नशीब आजमावत आहेत. यामध्ये ॲड. ललिता पाटील, ॲड. जी. एम. पाटील, रेखा कोचूरे आणि ॲड. माधुरी पवार यांचा समावेश आहे. या सर्व उमेदवारांनी जोरदार प्रचार मोहीम राबवली असून, जिल्ह्यातील वकिलांचे लक्ष या चारही उमेदवारांच्या कामगिरीकडे लागले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या निवडणुकीसाठी एकूण सुमारे १ लाख ७० हजार मतदार नोंदणीकृत आहेत. त्यापैकी सुमारे १ लाख ३० हजार ते १ लाख ४० हजार वकिल मतदान करतील, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मोठ्या प्रमाणावर होणारे हे मतदान उमेदवारांच्या भवितव्यासाठी निर्णायक ठरणार आहे.
या निवडणुकीची प्रक्रिया व्यापक स्वरूपाची असून, संपूर्ण मतदान बॅलेट पेपरद्वारे घेतले जात आहे. उमेदवारांची संख्या मोठी असल्याने आणि मतमोजणी प्रक्रिया गुंतागुंतीची असल्याने, अधिकृत निकाल जाहीर होण्यासाठी सुमारे सहा महिन्यांचा कालावधी लागू शकतो. त्यामुळे उमेदवारांना निकालासाठी दीर्घ प्रतीक्षा करावी लागणार आहे.
मतदान प्रक्रियेदरम्यान शिस्तबद्ध वातावरण दिसून आले असून, वकिलांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून लोकशाही प्रक्रियेला बळकटी दिली आहे. या निवडणुकीमुळे बार कौन्सिलच्या नेतृत्वात कोणते बदल होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



