Home धर्म-समाज सुनील दैवे प्रकरण पेटले; उर्वरित आरोपींच्या अटकेसाठी तेली समाजाचा आक्रमक पवित्रा

सुनील दैवे प्रकरण पेटले; उर्वरित आरोपींच्या अटकेसाठी तेली समाजाचा आक्रमक पवित्रा


बोदवड-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।  येथील सुनील दैवे यांच्या मृत्यू प्रकरणाने आता गंभीर वळण घेतले असून, उर्वरित आरोपींना तातडीने अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. तेली समाज बहुउद्देशीय सेवा संस्थेने याबाबत पोलिस प्रशासनाला निवेदन देत न्यायाची मागणी केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवार दिनांक ११ मार्च २०२६ रोजी स्वर्गीय सुनील शामराव दैवे यांना त्यांच्या घरासमोर काही आरोपींनी मारहाण केली होती. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना १९ मार्च रोजी रात्री त्यांचा मृत्यू झाला. मारहाणीमुळे त्यांच्या मेंदूला गंभीर दुखापत झाल्यानेच मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात येत आहे.

या घटनेनंतर परिसरात संतापाचे वातावरण असून, संबंधित सर्व आरोपींना तातडीने अटक करून कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी जोर धरत आहे. तेली समाज बहुउद्देशीय सेवा संस्थेने बोदवड पोलीस ठाण्याला दिलेल्या निवेदनात उर्वरित आरोपींना लवकरात लवकर अटक न झाल्यास गावात दहशतीचे वातावरण निर्माण होण्याची भीती व्यक्त केली आहे. तसेच कायदा हातात घेण्याच्या घटना वाढू शकतात, अशीही चिंता व्यक्त करण्यात आली आहे.

मृत सुनील दैवे यांच्या कुटुंबावर या घटनेचा मोठा आघात झाला आहे. त्यांच्या पश्चात दोन लहान मुली, पत्नी आणि वृद्ध आई असा परिवार असून, घरातील कर्ता पुरुष गमावल्याने कुटुंबाचा आधार कोसळला आहे. लहान वयातच मुलींवर पितृछत्र हरपण्याचे दुःख ओढवले असून, वृद्ध आईला मुलाच्या मृत्यूचा आघात सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर पीडित कुटुंबाला न्याय मिळावा, अशी भावनिक मागणीही करण्यात आली आहे.

याच निवेदनात गावातील कायदा व सुव्यवस्था राखण्याबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. रात्री उशिरापर्यंत काही तरुणांचे गट परिसरात बसून गोंधळ घालतात, मोबाईलवर खेळतात व नागरिकांना त्रास देतात, अशी तक्रार करण्यात आली आहे. भीतीपोटी नागरिक पुढे येत नसल्याने पोलिसांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन कठोर पावले उचलावीत, अशी मागणी करण्यात आली आहे.

भारतीय न्यायव्यवस्थेवर विश्वास असल्याचे नमूद करत, संबंधित सर्व आरोपींना अटक करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, तसेच गावात शिस्त आणि सुरक्षितता राखण्यासाठी पोलिसांनी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी संस्थेकडून करण्यात आली आहे.

 


Protected Content

Play sound