भडगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भडगाव शहरात अमली पदार्थांच्या तस्करीचा एक धक्कादायक प्रकार समोर आला असून, पोलिसांनी मोठी कारवाई करत दाम्पत्याला अटक केली आहे. शहरात प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणावर ‘एमडी’ (मेफेड्रोन) या घातक अमली पदार्थाचा साठा जप्त करण्यात आल्याने संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. याबाबत भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, पारोळा शहराकडून भडगावकडे एका खाजगी कारमधून अमली पदार्थांची मोठी खेप येणार असल्याची गोपनिय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीची गांभीर्याने दखल घेत, भडगाव पोलिसांनी जुन्या पारोळा रस्त्यावरील पाण्याच्या टाकीजवळ रविवारी २२ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास कडेकोट नाकाबंदी करून सापळा रचला. यावेळी संशयास्पद वाटणारी फोर्ड फिस्टा कार क्रमांक (एमएच ०१ बीबी २२१६) अडवून तिची सखोल झडती घेण्यात आली.

घातक ‘एमडी’ साठा जप्त:
तपासणीदरम्यान कारमध्ये अत्यंत चलाखीने लपवून ठेवलेल्या मेफेड्रोन (MD) या अमली पदार्थाच्या १४.३५० ग्रॅम वजनाचे सुमारे १० पुड्या ज्याची किंमत ४० हजार रूपये आहे. पोलीसांनी हा मुद्देमाल जप्त केला आहे. हा पदार्थ मानवी आरोग्यासाठी अत्यंत घातक असून तो पूर्णपणे प्रतिबंधित आहे. या कारवाईत पोलिसांनी अमली पदार्थांसह तस्करीसाठी वापरलेली कारही जप्त केली आहे. जप्त करण्यात आलेल्या पदार्थाची तांत्रिक खातरजमा करण्यासाठी जळगाव येथील फॉरेन्सिक तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले आहे. या प्रकरणामागे अमली पदार्थ तस्करीचे एखादे मोठे आंतरजिल्हा रॅकेट कार्यरत असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
या प्रकरणी पोलिसांनी योगेश हरी चौधरी (वय ३५) व त्याची पत्नी (दोघेही रा. पारोळा, ह.मु. भडगाव) जागीच ताब्यात घेतले आहे. दोघांवर एनडीपीएस कायद्यांर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक महेश शर्मा हे करीत आहे.



