जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जुन्या भांडणाची कुरापत काढून कुसुंबा परिसरात दहशत माजवणाऱ्या टोळीने एका महिलेच्या घरात घुसून प्रचंड तोडफोड केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. “आम्ही जळगावचे डॉन आहोत, आमच्या वाटेला गेलात तर मुडदे पाडू,” अशी धमकी देत या संशयितांनी परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण केले होते. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून एकाला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अरुणाबाई करतार पवार (वय ५०, रा. कुसुंबा) या २१ मार्च रोजी दुपारी आपल्या घरात असताना, जुन्या भांडणाच्या कारणावरून कुणाल पाटील, गुड्या, गणेश कोळी, बबलु आणि दादू (पूर्ण नाव माहीत नाही) या पाच जणांनी त्यांच्या घरावर हल्ला केला. संशयितांच्या हातात कोयत्यासारखे घातक शस्त्र होते. त्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि घरातील भांडी व इतर सामानाची तोडफोड करून नुकसान केले.

यावेळी संशयित आरोपींनी मोठ्याने आरडाओरड करत, “आम्ही नुकतेच जेलमधून बाहेर आलो आहोत, आम्ही जळगावचे डॉन आहोत,” असे ओरडून परिसरात दहशत निर्माण केली. “कोणी मध्ये आले तर त्याचे मुडदे पाडू,” अशी धमकीही त्यांनी दिली. या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार कुणाल पाटील, गुड्या, गणेश कोळी, बबलु आणि दादू (पूर्ण नाव माहीत नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे करत आहेत.



