धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव शहरात घरफोडीच्या घटनांनी पुन्हा एकदा डोके वर काढले असून, संताजी नगर परिसरात भरवस्तीत चोरट्यांनी दोन बंद घरे फोडल्याची घटना समोर आली आहे. या घरफोडीत एकूण १ लाख ७८ हजार ५०० रुपयांचे सोन्याचे दागिने आणि रोकड लंपास करण्यात आली आहे. याबाबत रविवारी २२ मार्च रोजी दुपारी साडेतीन वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, धरणगाव शहरातील संताजी नगरात अरुणाबाई भाऊराव शिंदे (वय ६५) आणि त्यांच्या घरासमोर राहणारे शेजारी उषाबाई ईश्वरलाल चौधरी हे दोघेही आपापल्या घरांना कुलूप लावून बाहेरगावी गेले होते. चोरट्यांनी हीच संधी साधून २१ मार्चच्या रात्री ११ वाजेपासून ते २२ मार्चच्या सकाळी ८:३० वाजेदरम्यान दोन्ही घरांचे कडी-कोंडा तोडून आत प्रवेश केला.

चोरट्यांनी घरातून दोन्ही घरातून सोन्याचे दागिने आणि रोकड असा एकुण १ लाख ७८ हजार ५०० रूपये किंमतीचा ऐवज चोरून नेला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर अरूणाबाई शिंदे यांनी धरणगाव पाोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष पवार हे करीत आहे.



