जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव महानगरपालिकेचा कारभार अधिक लोकाभिमुख, पारदर्शक आणि प्रभावी करण्याच्या उद्देशाने महापौर दीपमाला काळे यांच्या संकल्पनेतून एक अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे. मनपातील सर्व ७५ नगरसेवक आणि अधिकाऱ्यांसाठी विशेष प्रशिक्षण वर्गाचे आयोजन मंगळवारी (दि. २४) सकाळी ११ वाजता मनपा सभागृहात करण्यात आले असून, या उपक्रमाकडे शहराचे लक्ष लागले आहे.
या प्रशिक्षण वर्गाच्या माध्यमातून लोकप्रतिनिधींना महापालिकेच्या कामकाजाचे सखोल आणि शास्त्रशुद्ध ज्ञान देण्यात येणार आहे. महापालिकेतील विविध विभागांची रचना, त्यांची जबाबदारी, तसेच प्रत्यक्ष प्रशासन कसे चालते याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. अनेकदा तांत्रिक माहितीच्या अभावामुळे नगरसेवकांना काम करताना अडचणींचा सामना करावा लागतो, त्या दूर करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार आहे.

यासोबतच, सामान्य नागरिकांच्या दैनंदिन समस्या ओळखून त्या प्रभावीपणे महासभेत किंवा प्रशासनासमोर मांडण्याचे कौशल्य विकसित करण्यावर भर दिला जाणार आहे. एखादा मुद्दा कायदेशीर आणि तांत्रिकदृष्ट्या सक्षम पद्धतीने मांडल्यास तो जलदगतीने निकाली निघू शकतो, याबाबतही प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यामुळे नगरसेवकांच्या कार्यक्षमतेत वाढ होऊन नागरिकांच्या समस्यांचे निराकरण अधिक प्रभावीपणे होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
या प्रशिक्षणासाठी मार्गदर्शक म्हणून प्रसिद्ध वक्ते, लेखक, विश्लेषक आणि अर्थव्यवस्थेचे अभ्यासक दीपक करंजीकर उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या सखोल ज्ञानामुळे नगरसेवकांना प्रशासकीय व आर्थिक विषयांची मांडणी करण्याचे कौशल्य आत्मसात करण्याची संधी मिळणार आहे. करंजीकर यांच्या मार्गदर्शनामुळे लोकप्रतिनिधींना निर्णयप्रक्रियेत अधिक सक्षम होण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
महापौर दीपमाला काळे यांच्या पुढाकारातून राबविण्यात येणारा हा उपक्रम जळगाव महापालिकेच्या कामकाजात नवे बदल घडवून आणणारा ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या प्रशिक्षणामुळे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील समन्वय अधिक मजबूत होऊन शहराच्या विकासाला गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.



