जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रविवारी झालेल्या प्राणघातक हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरूणाचा उपचार सुरू असतांना मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
या संदर्भातील माहिती अशी की, काल म्हणजेच दिनांक २२ मार्च रविवार रोजी दुपारी शहरात एका तरूणावर चाकूने हल्ला करण्यात आल्याची घटना घडली होती. जैनाबाद परिसरात ही भयंकर घटना घडली होती. यात नितीन नाना काळे या तरूणावर शाम तुकाराम सुर्यवंशी याने धारदार शस्त्रासह हल्ला चढविला होता. यात नितीन काळे हा गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर शासकीय वैद्यकीय रूग्णालयात उपचार सुरू होते.

दरम्यान, नितीन काळे याच्यावर उपचार सुरू असतांनाच आज पहाटे त्याची प्राणज्योत मालवली. यामुळे परिसर हादरला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडालेली आहे. याबाबत माहिती देतांना मयत नितीन नाना काळे यांच्या भावाने नितीन काळे आणि शाम सुर्यवंशी यांच्यात जुना वाद असून कोर्टात याची तारीख असल्याची माहिती दिली. या खटल्यात तडजोड करावी म्हणून सुर्यवंशी हा नितीन याला गोड बोलून घेऊन गेला आणि तेथे त्याने दारू पाजून नितीनवर प्राणघातक हल्ला केल्याची माहिती दिली.
मयत नितीन काळे हा गोवा येथे नोकरीला असून तो अधून-मधून घरी येत होता. सध्या तो आजच्या कोर्टातील तारखेसाठी आला असतांनाच त्यांच्यावर हल्ला करून खून करण्यात आल्याची माहिती त्याच्या भावाने दिली. या प्रकरणी शनिपेठ पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याचे वृत्त आहे.



